राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे येथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा !

मुंबई – महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे तेथील परंपरांनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला. मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली होती. नववर्षाच्या सकाळी लाखो भाविकांनी मंदिरांत जाऊन देवदर्शन घेतले.

१. पंढरपूर येथे गुढीपाडव्याला श्री विठ्ठल मंदिरावरचा ध्वज पालटला जातो. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही ध्वज पालटण्यात आला.

२. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीची अलंकारपूजा गुढीपाडव्याच्या निमित्ताने करण्यात आली. पहाटेच मंदिरात गुढी उभारण्यात आली.

३. कोल्हापूर येथे प्रतीवर्षीप्रमाणे येथील भवानी मंडपाला साखरेची मोठी माळ लावण्याचा कार्यक्रम पार पडला.

४. जेजुरी येथे प्रतीवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याला श्री खंडेरायाच्या पूर्ण मूर्तीवर सकाळीच सूर्यकिरणाचा अभिषेक झाला.

५. शिर्डी येथील मंदिरातही गुढीपाडव्यानिमित्त सजावट करण्यात आली होती, तसेच श्री साईंच्या मूर्तीला अलंकार घालण्यात आले होते.