लक्ष्मणपुरी आणि कानपूर येथे विविध ठिकाणी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन
हिंदु जनजागृती समितीचे लक्ष्मणपुरी आणि कानपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘हलालमुक्त भारत अभियान’ !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. हे संकट थोपवण्यासाठी भारताला ‘हलालमुक्त’ करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ‘हलालमुक्त भारत अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये ९ ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१. कानपूर येथे ‘हलाल प्रमाणपत्र : एक भारतविरोधी षड्यंत्र’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन
येथील लेनिन पार्कमधील आर्य समाज मंदिरामध्ये ‘हलाल प्रमाणपत्र : एक भारतविरोधी षड्यंत्र’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी हा विषय कानपूरमध्ये अधिक व्यापक स्तरावर राबवण्याचा निश्चय केला. याप्रसंगी ‘झटका व्यवसाय महासंघा’चे अध्यक्ष, आधुनिक वैद्य, अधिवक्ते, पत्रकार, तसेच रा.स्व. संघ आणि आर्य समाज यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचा ४० जिझासूंनी लाभ घेतला.
२. ‘हलाल जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात जनजागृती करण्याचा निर्धार
कानपूर येथील जुहीलाल कॉलनीतील शैलकमाता मंदिरामध्ये ‘हलाल जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ या विषयांवर श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन ‘शाश्वत टाइम्स’चे संपादक श्री. मनोज दीक्षित यांनी केले होते. या कार्यक्रमात उपस्थित तरुण आणि महिला यांनी उपरोक्त विषयांच्या विरोधात जनजागृती करण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमाला ५० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
३. लक्ष्मणपुरी येथील सुशांत गोल्फ सिटीमध्ये मार्गदर्शन
येथील सुशांत गोल्फ सिटीमध्ये श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल अर्थव्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘लोकभारती’चे सहव्यवस्थाप्रमुख श्री. कमलेश कुमार गुप्ता यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला रा.स्व. संघ, लोकभारती, बंगो लोकभारती, भारतीय सैन्यात कार्यरत आणि सुशांत गोल्फ सिटीमधील निवास करणारे असे १०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी ‘हलाल जिहाद’च्या विरोधात संघटित प्रयत्न करण्याचा निर्धार केला.
४. अर्जुनगंज येथे वैद्यकीय व्यवसायातील हिंदूंना मार्गदर्शन
अर्जुनगंज येथील ‘ॲडव्हान्स न्यूरो हॉस्पिटल’मध्ये ‘हलाल अर्थव्यस्था’ या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला श्री. रमेश शिंदे यांनी संबोधित केले. या वेळी रा.स्व. संघाचे कार्यकर्ते आणि वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी त्यांच्या स्तरावर जागृती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
५. राजाजीपूरम् येथे हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार
‘जनउद्घोष सेवा संस्थे’च्या माध्यमातून राजाजीपूरम् येथे ‘हिंदु राष्ट्र आणि हलाल अर्थव्यवस्था’ यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्थानिक ११० हून अधिक लोक उपस्थित होते. या प्रसंगी ‘हलाल’च्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाला संतांची वंदनीय उपस्थिती लाभली.
६. लक्ष्मणपुरी येथील विनयखंडमध्ये ‘हलाल अर्थव्यवस्था’या विषयावर संबोधन
लक्ष्मणपुरी येथील विनयखंडमध्ये ‘हलाल अर्थव्यवस्था’ या विषयावर श्री. रमेश शिंदे यांनी बैठकीला संबोधित केले. या बैठकीचे आयोजन पत्रकार श्री. सुमित पांडे यांनी केले होते. या बैठकीला उपस्थित हिंदूंनी ‘त्यांच्या घरून जागृतीला प्रारंभ करू’, असे सांगितले. या बैठकीला २१७ किलोमीटर दूर असलेल्या आंबेडकरनगर येथील एक धर्मप्रेमी उपस्थित होते.
७. ऐतिहासिक काकोरी येथे मार्गदर्शन
ऐतिहासिक काकोरी येथील ‘हिंदु जनसेवा समिती’च्या माध्यमातून ‘हलाल अर्थव्यवस्था’ याविषयी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात योगदान द्यावे’, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थित युवकांना केले. याप्रसंगी ४५ हून अधिक युवक उपस्थित होते.
८. लक्ष्मणपुरी येथे ‘हलाल जिहाद’ विषयावर अधिवक्त्यांमध्ये जागृती
लक्ष्मणपुरी येथे श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल जिहाद’ या विषयावर अधिवक्त्यांना मार्गदर्शन केले. यासंदर्भात अधिवक्ता संजीवकुमार तिवारी यांनी लक्ष्मणपुरी न्यायालयातील अधिवक्त्यांसाठी जागृती बैठक आयोजित केली होती.
क्षणचित्रे
१. या कार्यक्रमांमध्ये जिज्ञासूंनी हिंदु जनजागृती समितीचे ‘हलाल जिहाद ?’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ हे ग्रंथ मोठ्या प्रमाणात खरेदी केले.
२. राजाजीपूरम् येथील कार्यक्रमाला समाजातील २ संत उपस्थित होते. त्यांनी ‘हलाल जिहाद’ हा विषय पूर्णपणे ऐकला, तसेच त्यांच्या भागात अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा प्रदर्शित केली.