भविष्यात सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल ! – धीरज वाटेकर, पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते
२१ मार्च या दिवशी ‘वनफेरी’ काढून ‘जागतिक वनदिन’ साजरा !
चिपळूण – २१ मार्च हा ‘जागतिक वनदिन’ संपूर्ण जगात वनांसाठी वाहिलेला दिवस आहे. वृक्षांची आठवण, स्मरण, त्यांची आवश्यकता आपण जाणायला हवी; म्हणून या दिवसाचे प्रयोजन आहे. वनांचा मानवी जीवनाशी निकटचा संबंध असून आपली औषधे, उपजीविका त्यावर आहे. जैवविविधतेविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी. जंगल निर्माण आणि संवर्धनाची शपथ आपण सर्वांनी घेण्याचा हा प्रेरणादायी दिवस आहे. असे असले, तरी दिवसेंदिवस मनुष्य अधिकाधिक वृक्षतोड करतो आहे. मनुष्याने वृक्षतोड करू नये, वृक्षसंवर्धन करावे, यासाठी आपल्याला सर्वांना भविष्यात ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल, असा कानमंत्र पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते श्री. धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळा’च्या वतीने शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उक्ताडच्या विद्यार्थ्यांनी वृक्षलागवडीसह वाशिष्ठी नदीच्या किनारी भागात असलेल्या जुवाड बेटापर्यंत ‘वनफेरी’ काढून साजरा केलेल्या जागतिक वनदिन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून श्री. वाटेकर बोलत होते.
श्री. धीरज वाटेकर पुढे म्हणाले,
१. सध्याचे दिवस चैत्र पालवीचे दिवस आहेत. वनराई कोवळ्या पानांसह नवे रूप धारण करून आपल्यासमोर आलेली आहे. आपण ज्या शहरात रहातो, त्या शहराच्या भूमीतील पाण्याची पातळी पूर्वीपेक्षा न्यून झालेली आहे. भविष्यात पाण्याचे संकट गंभीर होण्याचा धोका आहे. पावसाच्या आणि भूमीतील पाण्याच्या उपलब्धतेसाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत.
२. भविष्यात पिण्यासाठी पाणी हवे असेल, तर स्वत:च्या घराशेजारी आपल्याला वृक्ष लावावे आणि जपावे लागतील. यासाठी आपल्याला सर्वांना भविष्यात ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल. याची जाणीव व्हावी; म्हणून आजच्या दिवशी आपण सर्वांनी वनफेरी काढली.
३. निसर्गाचे, तसेच वनांचे सान्निध्य अनुभवण्यासाठी नदीकिनारी असलेल्या जुवाड बेटाच्या निसर्गात आपण एकत्र जमलो. आपण स्वतःहून एखाद्या कुंडीत किंवा भूमीत बियाणे घालून झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न केल्यास ते झाड आपल्याशी हितगुज करत असल्याचे जाणवेल. यातून आपल्याला निसर्गाशी एकरूप होता येईल, ‘वृक्षरक्षक’ होता येईल.
या वेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उक्ताड शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेपासून वाशिष्ठी नदी किनारी असलेल्या जुवाड बेटापर्यंत ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’ घोषणा देत वनफेरी काढली. बेटावर पोचल्यावर मुलांनी तेथील निसर्गाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी या वेळी झाडावर चढणे, झाडावरून आंबे काढणे आदींचा अनुभव घेतला.
वनफेरीपूर्वी शाळेत ग्रामस्थ विनोद चिपळूणकर आणि राजेंद्र शिगवण यांच्या उपस्थितीत ३ वर्षे वयाच्या जांभूळवृक्षाचे रोपण करण्यात आले. शाळा आणि विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचे दायित्व घेतले. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून ॲक्टिव्ह ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष कैसर देसाई उपस्थित होते. देसाई यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळा’चे वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सखाराम जावीर, शिक्षिका सीमा कदम, स्नेहा नेटके यांनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा –
♦ मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ साकारूया !
https://sanatanprabhat.org/marathi/664469.html