हिंदु संस्कृतीला वर्धिष्णू करणारा गुढीपाडवा !
गुढीपाडवा, म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचेे आगमन झालेले असते आणि ही संपूर्ण चराचर सृष्टी सृजनाच्या गंधाने रंगून गेलेली असते. कुठे शुभ्र मोगर्याला बहर आलेला असतो, तर कुठे आम्रवृक्षाच्या मोहराचा सुगंध दरवळत असतो. वृक्ष, वनस्पती चैत्र पालवीने फुलत असतात. दारासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. प्रवेशद्वारी झेंडू आणि आंब्याच्या पानांचे सुशोभित तोरण लावले जाते. पारंपरिक वस्त्रे घालून, गुढी उभारून गुढीचे पूजन केले जाते.
१. आयुर्वेदिक गुणधर्मांचा विचार करून सिद्ध होणारा प्रसाद !
या वेळी प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानाची चटणी दिली जाते. यात शरिराचाही विचार केला गेला आहे. पुढील काळात उष्णता वाढणार असते. त्यामुळे उष्णतेचे विकार संभवू शकतात. कडुनिंब हे उष्णतेवरील सर्वांत गुणकारी औषध आहे. काही ठिकाणी कडुनिंब, मिरी, सुंठ, ओवा यांच्या गोळ्या करून त्यांचे सेवन केले जाते. यावरून सणांच्या परंपरांचे महत्त्व लक्षात येते.
२. शालिवाहन शक
पैठणच्या शालिवाहन किंवा सातवाहन राजांनी अतुलनीय पराक्रम गाजवून परकीय शक वंशाच्या राज्यकर्त्यांवर मिळवलेल्या दैदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ, त्या राजांनी त्यांच्या नावाने कालगणना चालू केली. तिलाच ‘शालिवाहन शक’ असे म्हटले जाते, शालिवाहन शक हे वर्ष ७८ ला चालू झाले, म्हणजे इंग्रजी वर्ष २०२३ मधून ७८ वजा केले की, आपल्याला शालिवाहन शक १९४५ हे मिळते. शालिवाहन शकाचा आरंभ गुढीपाडव्याला होतो.
३. विक्रम संवत
उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने इ.सन पूर्व ५७ मध्ये कुशाण वंशीय राजांचा दारूण पराभव केला आणि हिंदुस्थानामधून त्यांना पळवून लावले. त्या विजयासाठी त्याने त्याच्या नावाने कालगणना चालू केली. वर्ष २०२३ मध्ये ५७ वर्षे मिळवली की आपल्याला विक्रम संवत २०८० मिळते; जे दिवाळीमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी चालू होत. गुजराती लोकांमध्ये शालिवाहन शकानुसार दिनदर्शिका असते.
४. भारतीय कालगणना
भारतीय कालगणने मध्ये चंद्र आणि सूर्य ह्या दोघांचाही भ्रमणाचा, योगांचा मेळ घालून निसर्गाशी समन्वय साधणारी अशी कालगणना केली जाते. काही सण उत्सवांच्या दिवशी सूर्योदयाची तिथी शुभ मानली जाते, तर काही सण उत्सवांमध्ये पौर्णिमेला म्हणजे चंद्राच्या तिथीला महत्त्व असते; उदा. चतुर्थी, श्रावणी पौर्णिमा, वटपौर्णिमा, कोजागिरी, होळी पौर्णिमा इ. आमचे कुठलेही शुभ कार्य करतांना संकल्पामध्ये तिथी, वार, नक्षत्र, सूर्य-चंद्र रास तिथी, त्या शहराचे नदीतीरावरील स्थान या सर्वांचे उच्चारण करून शुभकार्याचा आरंभ केला जातो.
५. नववर्षाच्या स्वागतयात्रा
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, वसई-विरार आदी शहरांमधून आकर्षक साजशृंगार करून शोभायात्रा काढल्या जातात. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे संदेश देणारे चित्ररथ, ढोल-ताशा, लेझीम पथके, भजनी मंडळे आदींसह आकर्षक स्वागतकमानी, रांगोळ्या अशा मंगलमय वातावरणात या शोभायात्रा निघतात. यात सर्व भेद विसरून हिंदू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. त्यातूनच हिंदूंचे संघटन आणि एकत्रीकरण यांचे वातावरण अनुभवायला येते.
– सौ. अनघा अनिल साखरे, कोपरी, ठाणे