विजयोत्सवासाठी संघर्ष अटळ !
विशेष संपादकीय
गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व हिंदूंना शुभेच्छा आणि नमस्कार. ‘ऋतूनां कुसुमाकरः।’, (ऋतूंत मी वसंत ऋतू आहे) असे श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे. सर्वश्रेष्ठ ऋतूत येणारा हिंदूंचा नववर्षारंभ अत्यंत उल्हासित आणि प्रसन्न वातावरण घेऊन येतो. सध्या हिंदु समाज आणि भारत देश यांची स्थिती पहाता ‘खरे सण हिंदु राष्ट्रातच साजरे होतील’, असे प्रकर्षाने वाटते. ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी संघर्ष अटळ असला, तरी ते येणे अशक्य नाही, हे आता हिंदुत्वनिष्ठांना उमजून चुकले आहे. त्यासाठीच या वर्षी ‘शुभकृत’ संवत्सर पालटून ‘शोभन’ या संवत्सरात प्रवेश करतांना गेल्या वर्षातील हिंदुत्वाच्या दृष्टीने घडलेल्या मंगल आणि अमंगल घटनांचा आढावा घेणे उचित ठरेल.
हिंदु राष्ट्राच्या दिशेने एक पाऊल !
लव्ह जिहादच्या असंख्य अमंगल घटना घडल्या, तरी या वर्षी त्याच्या संघर्षाची ठिणगी जनमानसापर्यंत पोचून सहस्रोंच्या संख्येने राज्याच्या बहुसंख्य शहरांत हिंदूंचे मोर्चे निघाले. त्या माध्यमातून झालेले हिंदूंचे एकत्रीकरण ही एक पुष्कळच आशादायी प्रगती आहे. हे मोर्चे हिंदूंवरील आघातांचा शेवट करण्याच्या मागण्यांसाठी आणि ‘शेवटची सूचना’ म्हणून आहेत’, असे समजून चालण्यास हरकत नाही. या वर्षी समाजकंटकांच्या अवैध वास्तूंवर ‘बुलडोझर’ चालवण्याच्या कारवाईला आरंभ झाला. ही एक परिणामकारक उपाययोजना कार्यवाहीत आणली गेली. शिक्षणक्षेत्रामध्ये आपला प्रगत प्राचीन इतिहास शिकवण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले, ही स्वागतार्ह गोष्ट घडली आहे. गेल्या मासामध्ये बागेश्वरधाम (मध्यप्रदेश) येथील हनुमानभक्त धीरेंद्रशास्त्री अचानकपणे प्रसिद्धीच्या झोतात आले काय आणि त्यांनी रामराज्य आणणार्या ‘हिंदु राष्ट्रा’चे सूत्र उचलून धरले काय.
विजयोत्सवासाठी संघर्ष अटळ !
त्यांचे मार्गदर्शन ‘हिंदु राष्ट्र की जय’ म्हणून चालू होते. नुकतेच मीरारोड येथे झालेल्या मार्गदर्शनाच्या वेळी ते म्हणाले, ‘‘माझे सनातन राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातून पूर्ण होईल, असे वाटते; कारण महाराष्ट्र ही संत आणि भक्त यांची भूमी आहे; म्हणून मी येथे आलो आहे.’’ त्यांची ही ईश्वरनिष्ठा त्यांना मिळणार्या यशाचे गमक आहे. धर्मसंस्थापनेच्या दिशेने एक एक पाऊल पडणे चालू झाल्याच्या द्योतक असलेल्या या घटना केवळ आश्चर्यकारक नसून समस्त हिंदूंसाठी त्या एक एक आशेचे किरण आहेत. अमेरिकेतील अधिकोष बुडत असतांना भारताकडे मात्र सर्व जग उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून पहात आहेत, ही चांगली गोष्ट आहे; परंतु येत्या काळात बेरोजगारीच्या समस्या सोडवण्यास सरकारला भर द्यावा लागणार आहे.
काळाशी संघर्ष अटळ !
मागील मासात तुर्कीयेमध्ये झालेल्या भूकंपात ५२ सहस्रांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्यावर नुकताच तिथे प्रचंड पूर आला आणि त्याने तंबूत रहात असलेल्या लोकांचाही निवारा काढून घेतला. हिंदूंनो, येणारा काळ गेल्या ४-५ वर्षांपेक्षाही कदाचित् अधिकाधिक संकटांनी भरलेला असणार आहे. भर्तृहारीने म्हटले आहे, ‘कः कालस्य न गोचान्तरगतः ।’ म्हणजे ‘काल कुणाला भक्षण करत नाही ?’ कलियुगात रज-तम वाढून पापाचरण करणार्यांची संख्या वाढल्याने त्यांना तो मोठ्या संख्येने भक्षण करणारच आहे. युरोप, आफ्रिकेप्रमाणे भारतामध्येही वणव्यांचे प्रमाण वाढले. गेल्या काही काळात भूकंप, पूर, वादळे आदी नैसर्गिक संकटांमध्ये झालेली सर्व प्रकारची प्रचंड हानी ही याचेच द्योतक आहे. आद्यशंकराचार्यांच्या ४ मठांपैकी एक असलेल्या, त्यांना ज्ञानप्राप्ती करून देणारे स्थान असणार्या ‘शांकरभाष्य’ ग्रंथाचे निर्मितीस्थळ असलेला जोशी मठ (ज्योतिर्मठ) याला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. हे चांगले लक्षण नाही. ही स्थिती अंतर्मुख होऊन महान काळाला समजून घेण्याची आणि अधिकाधिक उपासनाभक्ती वाढवण्याची आहे. यासाठीच या घटना आणि प्रसंग घडत आहेत. याची जाणीव जे भक्त ठेवतील, ते या संधीकाळातील कठीण कालचक्राला भेदून पुढे जातील.
येत्या काळाची दिशा
सरकारने जोशी मठाच्या जीर्णोद्धाराचे दायित्व घेणे अत्यावश्यक आहे. शासन मंदिरांचा पर्यटनस्थळांच्या दृष्टीने विकास करत आहे, त्याचसमवेत तीर्थस्थळांचे आध्यात्मिक चैतन्य कसे टिकेल, हे पहाणे आवश्यक आहे. ‘लोक हिंदु राष्ट्राची मागणी करू शकतात, तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही ?’, असे लाल किल्ल्याच्या येथे झालेल्या दंगलीत सहभागी खलिस्तानवाद्यांंचा प्रमुख अमृतपाल सिंह म्हणत आहे. खलिस्तानच्या मागणीची चळवळ केवळ झेंडे फडकवण्यापर्यंत नव्हे, तर देशाच्या पंतप्रधानांना थेट आवाहन देण्यापर्यंत आणि राजधानीत दंगल करण्यापर्यंत पुढे गेली आहे. खलिस्तानवाद्यांचा परत एकदा समूळ बिमोड करणे, हे सरकारपुढचे मोठे आव्हान आहे. शीख हे हिंदु राष्ट्राचाच भाग आहेत आणि त्यांचे शत्रूही धर्मांध आतंकवादी आहेत, हे ‘आय.ए.एस्.’ला मिळालेल्या खलिस्तान्यांना लक्षात आणून देण्याचे मोठे आवाहन या देशापुढे आता आहे. हिंदूंच्या संरक्षणासाठीच शीख पंथाची स्थापना झाली आहे. स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती त्यांच्या पंथात आहे. देशातील प्रत्येक घटकानेच आता त्याग आणि संघर्ष करण्याची ही वेळ आहे. ‘हलाल जिहाद’चे संकट परतवून लावण्यासाठी त्याचे प्रमाणपत्र घेणार्या उद्योगमालकांचे प्रबोधन करणे, अनावश्यक चिनी वस्तूंची खरेदी-विक्री थांबवणे, हे सारे केवळ न केवळ प्रखर राष्ट्राभिमान असल्याविना शक्य होणार नाही. आसाममध्ये ६०० हून अधिक मदरसे बंद करण्यात आले. येत्या काळात त्याचे अनुकरण करण्याची संधी अन्य राज्य सरकारांनी घ्यायला हवी. सध्या जे हिंदू कुठल्या ना कुठल्या हिंदुत्वाच्या सूत्रावरून एकत्र येत आहेत, त्यांच्यात प्रखर राष्ट्राभिमान अधिक कसा निर्माण होईल, हे पहाणे आवश्यक आहे. धर्माभिमानानेच प्रखर राष्ट्राभिमान टिकू शकतो आणि तो सत्कारणी लागू शकतो. स्वतः धर्माचरण करून धर्मातील उदात्त आणि मंगल गोष्टी अनुभवल्या की, आपला धर्माविषयीचा अभिमान अन् प्रेम वाढते. त्यासाठी भगव्या ध्वजाच्या स्फुल्लिगं चेतवणार्या गीतासमवेत स्वतःकडे विजयश्री खेचून आणण्यासाठी त्याला उपासनेची जोड द्यायला हवी. उपासनेची जोड आत्मबळ निर्माण करते. हे आत्मबळ प्रसंगी स्वरक्षणासाठी पुढची योग्य ती कृती करण्याचे धैर्य देते. हेच आत्मबळ आत्मसन्मान निर्माण करून लव्ह जिहादपासून दूर ठेवू शकते. अखंड आणि अजेय हिंदुस्थानची निर्मिती हे हिंदु राष्ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्पूर्वी ते प्रत्येकाच्या मनात येणे आवश्यक आहे, तरच तो तिथे रहाण्यास पात्र होईल !