(म्हणे), ‘लव्ह जिहाद आणि लॅण्ड जिहाद’चा प्रकार अस्तित्वातच नाही !’ – अबू आझमी, आमदार, समाजवादी पक्ष
‘लव्ह जिहाद’च्या सूत्रावरून आमदार अबू आझमी यांचा पत्रकार परिषदेत थयथयाट !
मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – मुळात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लण्ड जिहाद’चा प्रकार अस्तित्वात नाही. राज्यशासनाने गठीत केलेल्या ‘आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती’कडे ‘लव्ह जिहाद’ची एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही महिला आणि सांस्कृतिक बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्रात १ लाख ‘लव्ह जिहाद’च्या घटना असलेल्याची खोटी माहिती देत आहेत, अशी मुक्ताफळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत उधळली. या वेळी लव्ह जिहादच्या सूत्रावरून आझमी यांनी थयथयाट केला.
२० मार्च या दिवशी विधानसभेत औचित्याच्या सूत्राद्वारे त्यांनी ‘लव्ह जिहाद’चे सूत्र उपस्थित केले; मात्र भाजपच्या आमदारांनी त्यांच्या सूत्राला आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्या कामकाजाचा भाग विधानसभेच्या अध्यक्षांनी वगळण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आझमी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःची भूमिका मांडली.
(म्हणे), ‘तुम्हीच मला लव्ह जिहाद काय आहे ते सांगा !’ – अबू आझमी, आमदार
या वेळी ‘‘आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती’ आता स्थापन झाली आहे. गेल्या ४-५ मासांत अमरावती येथे लव्ह जिहादच्या ३२ घटना घडल्या आहेत. गेल्या २० वर्षांत लव्ह जिहादच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याची नोंद या समितीकडे करण्यात आलेली नाही. त्याविषयी तुम्ही बोलावे’’, असे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पत्रकारांनी विचारले असता अबू आझमी म्हणाले, ‘‘मुळात लव्ह जिहाद नाही. लव्ह जिहादच्या घटना समाजात घडत नाहीत. अनेक मुस्लिम तरुणीही हिंदु तरुणांसमवेत विवाह करून सुखी आयुष्य जगत आहेत. तुम्हीच मला ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय आहे ते सांगा.’’ (लव्ह जिहादच्या प्रती सप्ताह ४ ते ७ घटना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गेली अनेक वर्षे प्रसिद्ध केल्या जात आहेत. हा जिहाद करणार्यांनी स्वतः, केरळ उच्च न्यायालयाने, तसेच विदेशी वृत्तपत्रांनी याविषयी वारंवार हा जिहाद धर्मांध करत असल्याविषयी सांगितले आहे. अबू आझमी कितीही ‘वेडगावहून पेडगाव’ला गेले आणि सत्याचा अपलाप करून कांगावा केला, तरी ते लपणार नाही ! – संपादक)
फसवून हिंदु तरुणीशी विवाह करणार्यांना कायद्यानुसार फाशी शिक्षा द्या !
‘‘मुसलमान तरुण अगोदर हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीशी विवाह करतात. नंतर तो तरुण मुसलमान असल्याचे समजते. अशा तक्रारी आलेल्या आहेत’’, असे एका पत्रकाराने विचारले असता आझमी म्हणाले, ‘‘असे जर होत असेल, तर ते चुकीचे आहे. असे होत नाही. कोणी अशी सक्ती करत असेल, तर त्याला कायद्यानुसार फाशी द्यावी.’’ (अशी असंख्य उदाहरणे असतांना आझमी कशाला खोटा आणून बोलत आहेत ? हिंदूंना फसवण्याचे दिवस आता संपले आहेत, हे आझमी यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)
‘‘औरंगाबादच्या नामांतराविषयी तुमचे मत काय आहे ? छत्रपती संभाजी महाराज यांचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता ?’’ याविषयी एका पत्रकाराने विचारले असता आझमी म्हणाले, ‘‘मी या गोष्टीत पडत नाही. आपला देश वर्ष १९४७ मध्ये स्वातंत्र्य झाला. आता जुन्या नामांतराच्या गोष्टी कशाला काढल्या जात आहेत ? अंतुले यांच्या नावाने देहली येथील रस्त्याला नाव दिले आहे.’’ (अंगावर आले की, झटकून टाकायचे, असाच हा भाग झाला. – संपादक) ‘याविषयी तुम्हाला कोणत्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे का ?’ असे विचारले असता ते म्हणाले की, सभागृहात मला कुणी पाठिंबा देत नाही; मात्र अधिवेशन झाल्यानंतर मला काही आमदार पाठिंबा देतात.
श्री. सुरेश चव्हाणके यांचा एकेरी भाषेत उल्लेख !
अबू आझमी यांच्या म्हणण्यानुसार १९ मार्च या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे काढलेल्या हिंदु जनजागरण मोर्च्यात सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी ‘औरंगजेबाच्या कबरीखाली हिंदूंचे मंदिर असल्या’चे भाषणात सांगितले. या पार्श्वभूमीवर ‘सुरेश चव्हाणके हा चुकीची माहिती देत आहे’, असा चव्हाणके यांचा त्यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला.