वाळूज प्रकल्पाविषयी बैठक घेण्यात येणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
विधानसभा लक्षवेधी सूचना…
मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज प्रकल्पाविषयी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेले दावे आणि इतर गोष्टी विचारात घेऊन सर्वंकष निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २० मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले. विधानसभेचे सदस्य शांताराम मोरे यांनी वाळूज प्रकल्पाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रकाश सोळंके, प्रशांत बंब, सीमा हिरे यांनी सहभाग घेतला.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, वाळूज महानगर प्रकल्पाच्या संमत धोरणानुसार भूमी मालकाचा प्रत्यक्ष प्रकल्पात सहभाग या संकल्पनेवर प्रत्येक महानगरातील विकास केंद्रासाठी १०० टक्के भूसंपादन प्रस्तावित आहे. विकास केंद्राबाहेर २५ टक्के संपादन करावयाचे असून उर्वरित ७५ टक्के क्षेत्राचा विकास भूमी मालकाने करावयाचा आहे. भूधारकांकडील ७५ टक्के भूमीवरील विकास करण्यास सिडकोकडून स्थगिती देण्यात आलेली नाही.