‘जलजीवन मिशन’च्या कामांमधील अनियमिततेविषयी उच्चस्तरीय चौकशी करू ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठामंत्री
विधानसभा लक्षवेधी
१० अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !
मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत कामे चालू आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणार्या ‘जलजीवन मिशन’च्या कामांमधील अनियमिततेविषयी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येतील. यामध्ये कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. १ मासाच्या आत चौकशी करण्यात येईल, असे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी २० मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले. विधानसभेच्या सदस्या सौ. नमिता मुंदडा यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य संदीप क्षीरसागर, लक्ष्मण पवार आणि धनंजय मुंडे यांनी सहभाग घेतला.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषदेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’च्या कामांमध्ये झालेल्या तक्रारीविषयी बीड जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे, तसेच विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या आदेशानुसार उपायुक्त विकास यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यीय चौकशी समिती गठित करून विभागीय आयुक्तालयाच्या वतीने चौकशी करण्यात आलेली आहे. यामध्ये दोषी असलेले १० अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आला आहे. दोषी असणार्यांवर कारवाई करण्यात आली आहे.