मी विधान मंडळास ‘चोरमंडळ’ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे ! – संजय राऊत, खासदार
खासदार संजय राऊत यांचे हक्कभंग नोटिशीला उत्तर !
मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – मी विधान मंडळास ‘चोरमंडळ’ म्हटले नसून एका फुटीर गटापुरताच तो उल्लेख आहे. या चोरमंडळातील सदस्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. यांपैकीच काहीजण हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते. विधीमंडळाचे हसे होऊ नये म्हणूनच मी हे परखड सत्य मांडले. बाकी विधीमंडळात कोणत्याही चोरमंडळास स्थान असू नये हा लोकशाहीचा संकेत आणि परंपरा आहे. मी त्या परंपरेचे पालन करणारा एक नागरिक आहे, असेही ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नोटिशीला पाठवलेल्या पत्राचे उत्तर देतांना म्हटले आहे.
विधानसभेचे सदस्य अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव विधीमंडळात सादर केला होता. उपस्थित केलेल्या विशेषाधिकार, तसेच अवमानाच्या सूचनेवर उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी मुदत वाढवून मागितली होती. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांना पाठवलेल्या नोटिशीला संजय राऊत यांनी पाठवलेल्या पत्रात त्यांनी हक्कभंग समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, समितीतील सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असून हक्कभंग कारवाई करणे हा विरोधकांचा डाव आहे. आम्हाला सर्व पदे माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. त्यांनी शिवसेना निर्माण केली. त्यामुळे सध्याचे बनावट शिवसेनेचे मंडळ हा विधीमंडळ नसून ‘चोरमंडळ’ आहे, असे मी म्हटले होते.