शेतकरी संकटात असल्याने हानीग्रस्त भागातील कर्मचार्यांनी कामावर उपस्थित रहावे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते
मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – शेतकर्यांच्या प्रश्नासह सरकारी कर्मचार्यांचा प्रश्न सरकार असंवेदनशीलपणे हाताळत आहे, असा आरोप करून विरोधी पक्षाने २० मार्च या दिवशी विधानसभेतून सभात्याग केला. सरकारी कर्मचार्यांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे; मात्र राज्यातील शेतकरी संकटात असतांना त्याला दिलासा देण्यासाठी हानीग्रस्त भागातील कर्मचार्यांनी कामावर उपस्थित व्हावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
अजित पवार या वेळी म्हणाले की, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहे. त्यातच सरकारी कर्मचारी संपावर आहेत, त्यामुळे हानीचे पंचनामे करण्याचे काम ठप्प आहे. शेतकर्यांना कोणतेही साहाय्य मिळत नाही. राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकरी असा दुहेरी कोंडीत अडकला आहे.