बनावट मद्यविक्री करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री
मुंबई, २० मार्च (वार्ता.) – मुंबईसह महाराष्ट्रात अवैध आणि बनावट मद्यविक्रीमुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे. हा प्रकार बिहारसह इतर राज्यांत होतो, असे नाही. आपल्या राज्यातही अवैध आणि बनावट मद्यविक्रीचे प्रकार घडणे, हा अतिशय गंभीर गुन्हा असून यातील मुख्य आरोपीला अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तारांकित प्रश्नाद्वारे २० मार्च या दिवशी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देतांना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ‘अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कठोर कलम लावून कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. खारघर आणि नवी मुंबई येथील अवैध मद्य वाहतुकीविषयी भुजबळ यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.