जीवघेणा ‘डीजे’ टाळा !
बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यात ‘डीजे’ ध्वनीक्षेपकाच्या कर्णकर्कश आवाजामुळे नवरदेवाचा मृत्यू झाला. वरमाला घालण्याच्या वेळी मोठ्या आवाजात ‘डीजे’ लावण्यात आला. नवरदेवाने तो आवाज सहन होत नसल्याचे सांगूनही कुणी आवाज अल्प करत नव्हते; कारण सर्वजण नाचण्यात दंग होते. परिणामी नवरदेवाला अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध पडला. चिकित्सालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मनोरंजनाचे विक्राळ रूप आनंदाच्या क्षणी एखाद्याचा जीव घेऊ शकते, हे किती संतापजनक आहे. १०५ डेसिबलच्या वरचा आवाज हा मानवासाठी धोकादायक ठरतो. त्याने रक्तदाब असणार्यांना, तसेच हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो. असे असतांना स्वतःच्या तामसिक सुखासाठी इतरांचा विचार न करता ‘डीजे’च्या भिंती उभारणे, हे समाजहिताचे नाही, हे सामान्यांना कधी कळणार ? अशांच्या विरोधात पोलीसही कठोर कारवाई करत नाहीत, हे अजूनच संतापजनक आहे.
वैदिक विवाहात वातावरण चैतन्यदायी आणि आल्हाददायक होण्यासाठी, तसेच कानांना सुमधुर वाटतील, असे सनई अन् चौघडे यांचा वापर करायला हवा. यासाठी शास्त्रीय संगीतही लावू शकतो. याचा परिणाम व्यक्तीच्या भोवती असलेले रज-तमाचे आवरण निघून जाते आणि सात्त्विकता वाढून संबंधितांना आनंद मिळतो, म्हणजेच वातावरणासह व्यक्तीचीही शुद्धी होते. ‘संगीता’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘मल्हार’, ‘भैरवी’ यांसारखे राग गायल्याने देवता प्रसन्न होतात. कलियुगात मानवाची सात्त्विकता अल्प झाल्याने, तसेच सर्वच गोष्टीत पाश्चात्त्यांच्या आहारी गेलेल्या मानवाला या अनुभूती घेता येत नाहीत. त्यामुळे महान भारतीय संस्कृतीचा वारसा असणार्या भारतियांचे हे आध्यात्मिक अपयशच म्हणावे लागेल.
आपल्याला महान ‘शास्त्रीय संगीत’ लाभले आहे. त्याने मानसिक शांतता लाभून आपला आत्मोद्धार होऊ शकतो. पाश्चात्त्यांनाही भारतीय संगीताची भुरळ पडते. विदेशातून संगीतप्रेमी भारतात येऊन भारतीय संगीत शिकत आहेत; पण आपण ‘डीजे’च्या मागे लागून स्वतःची हानी करून घेत आहोत; म्हणून सामाजिक, तसेच आध्यात्मिक हानी करणार्या या ‘डीजे’सारख्या वाद्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि नागरिकांचे मानसिक, तसेच शारीरिक आरोग्य जपावे !
– श्री. जयेश बोरसे, पुणे