महाराष्ट्रात हिंदु देवस्थानांच्या भूमींची लूट चालू आहे ! – आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
|
मुंबई, २० मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रातील सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांना संरक्षण मिळत नाही. राज्यातील हिंदु देवस्थानांच्या भूमींची राज्यात लूट चालू आहे. देवस्थानांच्या पुष्कळ प्रमाणात असलेल्या भूमी हडप करण्यात येत आहेत. हे षड्यंत्र गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. या सर्व घटनांमागे कुठले अधिकारी आहेत ? कुठले राजकीय नेते आहेत ? याचा कुणाला लाभ झाला ? या गोष्टींचा खुलासा संबंधित मंत्र्यांनी करावा. एक मासाच्या आत विशेष अधिकारी नेमून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करावे आणि जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी २० मार्च या दिवशी विधानसभेत केली. वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करतांना ते बोलत होते.
या वेळी जयंत पाटील यांनी हिंदु देवस्थानांच्या भूमींविषयी झालेल्या घोटाळ्यांची माहिती कागदपत्रांसह सभागृहात सादर केली. जयंत पाटील म्हणाले की, मोठ्या लोकांना हाताशी धरून हिंदु देवस्थानांच्या भूमी लाटल्या जात आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा करण्यात आली आहे. याविषयीचे कागदोपत्री पुरावे आहेत.
बीड जिल्ह्यातील श्री विठोबा देवस्थानची ४१ एकर भूमी मार्तंड नावाच्या पुजार्याला कसण्यासाठी देण्यात आली होती. या भूमीची सरकारकडे नोंद आहे. हा पुजारी मयत होऊन ३५-४० वर्षे झाली. त्यानंतर वर्ष २०२० मध्ये मार्तंडचे खोटे वारस (खासगी व्यक्ती) सिद्ध करून त्यांना भूमीची मालकी दिली आहे. तशी कागदपत्रे बनवण्यात आली आहेत. असे करून सरकारला फसवण्यात आले आहे, असे पाटील यांनी सांगितले.
गायरान भूमीविषयी ते म्हणाले की, गायरान भूमींची स्थितीही फारशी वेगळी नाही. गायरान भूमीचे भाग करून त्यांची विक्री करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनी धनदांडग्यांना या भूमी दिल्या आहेत.
संपादकीय भूमिकासंत भूमी असलेल्या महाराष्ट्रात हिंदु देवस्थानांच्या भूमींची लूट होणे, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! |