सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून स्वतःमध्ये आमूलाग्र पालट करणारे आणि मुलांना पूर्णवेळ साधना करण्यास प्रोत्साहन देणारे फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) !
श्री. राहुल राऊत (श्री. मनोहर राऊत यांचा मोठा मुलगा) , फोंडा, गोवा.
१. ‘बाबा आमच्या घराचे आधारस्तंभ आहेत. ते आम्हाला अडचणीच्या वेळी मार्ग काढण्यासाठी साहाय्य करतात.
२. बाबा साधना करू लागल्यावर त्यांच्यात धर्मप्रचाराची तळमळ आणि सेवेप्रती भाव निर्माण झाला. (१७.१.२०२३)
१. श्री. स्नेहल राऊत (श्री. मनोहर राऊत यांचा लहान मुलगा), चेन्नई
१ अ. बालपण : ‘माझ्या बाबांचा स्वभाव त्यांच्या लहानपणापासूनच चिडचिडा आणि रागीट होता. ते गावी असतांना लहानपणापासून कुस्ती खेळायचे. त्यांची प्रकृती पैलवानाप्रमाणे होती.
१ आ. नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवन
१ आ १. पैसे नसल्यामुळे दिवाळी साजरी करता न येणे : आम्ही एका चाळीत घर घेतले होते आणि तेथे रहात होतो. दिवाळीला संपूर्ण चाळीत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. आम्हाला आईने हातगाडीवरून १० रुपयांना एक असे शर्ट आणले होते. आमच्याकडे पैसे नसल्याने फटाके विकत घेण्याची आमची स्थिती नव्हती. आम्ही घरी फराळाचे काही केले नाही.
१ आ २. प.पू. बाळाराम बुवा यांनी आईला ‘काळजी करू नकोस, तुझा नवरा एके दिवशी संत तुकाराम महाराज यांच्यासारखा होईल’, असे सांगणे : आमचे आजोळ पुणे येथे होते. आई (सौ. अंजली राऊत) आम्हाला सुटीत पुण्याला घेऊन जायची. आमच्या आजीचे (कै. विठाबाई खेडकर यांचे) गुरु प.पू. बाळारामबुवा हे आजीच्या घरी येत असत. आई आजीच्या समवेत प.पू. बाळारामबुवा यांची सेवा करत असे. एकदा आईने त्यांना घरातील सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘‘तू काही काळजी करू नकोस. तुझा नवरा एके दिवशी संत तुकाराम महाराज यांच्यासारखा होईल.’’ ‘हे कसे होणार, ते देवालाच ठाऊक’, असे म्हणून आईने तो विषय तिथेच सोडून दिला.
१ आ ३. लहानपणापासून देवाची आवड असणे आणि श्रावण मासात ‘काशीखंड’ या ग्रंथाचे वाचन करणे : बाबांना लहानपणापासून देवाची पुष्कळ आवड होती. ते १४ वर्षांचे असतांना त्यांनी पादत्राणे न घालता चालत तुळजापूरची वारी केली होती. ते कधीच कुणाशी खोटे बोलले नाहीत. ते श्रावण मासात प्रत्येक वर्षी घरी ‘काशीखंड’ हा ग्रंथ वाचत असत. ते त्या काळात अनुमाने एक ते दीड मास दारू पिणे आणि मांसाहार करणे, या गोष्टी करत नसत.
१ इ. सनातन संस्थेशी संपर्क
१ इ १. बाबांमुळे मुलांमध्ये साधना आणि सेवा यांविषयी आवड निर्माण होणे : बाबांनी सेवा आणि साधना यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. त्यांना जीवनाचा उद्धार होण्यासाठी ‘साधना करणे’ हाच एकमेव आवश्यक घटक वाटू लागला. त्या वेळी आम्हाला साधनेची गोडी नव्हती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नामजप करत असू. त्यांच्यामुळेच आम्हाला सेवा आणि साधना यांची गोडी लागली.
१ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देव मानणे : एक दिवस बाबांनी घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणले आणि आम्हाला म्हणाले, ‘‘आजपासून हेच आपले देव आहेत.’’ बाबांनी असे सांगितल्यानंतर आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांनाच देव मानू लागलो आणि त्यांनाच प्रार्थना करू लागलो.
१ ई. सेवेला आरंभ
१ ई १. मुलाला शिक्षण पूर्ण करणार नसल्यास आश्रमात जाण्यास सांगणे : माझी १० व्या इयत्तेची परीक्षा झाल्यानंतर माझा ‘काहीतरी कोर्स करूया’, असा विचार होता. मी बाबांना हा विचार सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘शिक्षण सोडायचे असेल, तर आश्रमात जायचे. आश्रमात जायचे नसेल, तर शिक्षण पूर्ण करायचे.’’ त्या वेळी मी ‘काही दिवस आश्रमात जाऊन बघूया’, असे ठरवले.
१ उ. मुलाने साधनेसाठी पूर्णवेळ आश्रमातच रहायचे ठरवल्यावर पुष्कळ आनंद होऊन अन्य २ मुलांनाही पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात जाण्यास सुचवणे : मी आश्रमात साधना करण्यासाठी गेलो. माझी साधकांशी जवळीक झाली. मी आश्रमातून बाबांना दूरभाष करून विचारले, ‘‘बाबा, मी इथेच राहिलो, तर चालेल का ?’’ तेव्हा बाबांना पुष्कळ आनंद झाला. ते म्हणाले, ‘‘तुला जे हवे, ते मी तुला देईन; पण तू घेतलेला हा निर्णय कधीही पालटू नकोस. तू आश्रमात राहून साधना करून तुझ्या जीवनाचा उद्धार करून घे.’’ मी पूर्णवेळ साधक झाल्यावर बाबांनी माझ्या दोन्ही भावांनाही (श्री. राहूल आणि श्री. मेहुल यांना) विचारले, ‘‘तुम्हीही पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात जाणार का ?’’ तेव्हा आमची आर्थिक स्थिती अधिक चांगली होती, असेही नव्हते; पण बाबांना ‘आर्थिक स्थितीपेक्षा मुले चांगल्या मार्गाला लागत आहेत’, याचाच आनंद अधिक होता.’
२. सौ. समृद्धी स्नेहल राऊत (श्री. मनोहर राऊत यांची धाकटी सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. शिकण्याची वृत्ती : ‘बाबा (सासरे) आता दायित्व घेऊन सेवा करतात. त्यांच्यातील प्रत्येक गोष्ट शिकून घेण्याच्या तळमळीमुळेच त्यांना हे शक्य झाले आहे.
२ आ. परिस्थिती स्वीकारणे : एकदा बाबांचे त्यांच्या वडिलांशी मतभेद झाल्याने त्यांच्या वडिलांनी बाबांना केवळ अंगावरच्या कपड्यांनिशी घराबाहेर काढले. तेव्हा बाबा आणि आई (सौ. अंजली राऊत (सासूबाई)) यांनी परिस्थिती स्वीकारून सर्व पुन्हा उभे केले. त्यांनी ३ मुलांचे शिक्षण केले आणि त्यांना सेवेला पाठवले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच त्यांची तीनही मुले निश्चिंतपणे साधना करत आहेत.
२ इ. प्रामाणिकपणे नोकरी करून वरिष्ठ अधिकार्यांचा विश्वास संपादन करणे : बाबा ‘एअर इंडिया’ या आस्थापनात ‘चीफ कमर्शियल सुपरवायझर’ या पदावर होते. त्यांचे ‘बाहेरून येणारे साहित्य पडताळणे आणि त्याची देखरेख करणे’, असे काम असायचे. बाबांनी साधनेला आरंभ केल्यानंतर ते प्रामाणिकपणे काम करत असत. बाबांच्या समवेत काम करणारे अन्य कर्मचारी प्रवाशांना फसवून पैसे लुबाडायचे; मात्र वरिष्ठ अधिकार्यांचा बाबांवर विश्वास होता.
२ ई. मुलांवर चांगले संस्कार करणे : बाबांनी मुलांवर साधनेचे संस्कार केले. त्यांनी मुलांना काही अल्प पडू दिले नाही. बाबांच्या शिस्तप्रियतेमुळे मुलेही कधी अयोग्य मार्गाला लागली नाहीत. ते मुंबईसारख्या ठिकाणी रहात असूनही त्यांची मुले लहान वयात साधनेला लागली आणि साधनेत प्रगतीही करत आहेत. बाबांनी केलेला त्याग आणि संस्कार यासाठी कारणीभूत आहेत.
२ उ. विदेशांत जाऊन तळमळीने धर्मप्रचार करणे : बाबांना ‘एअर इंडिया’कडून विदेशात जाण्याच्या तिकिटावर सवलत असल्याने त्यांनी विदेशांत जाऊन धर्मप्रचार केला. ते पत्नी आणि मुले यांनाही तेथे घेऊन जायचे. ते विदेशात जिज्ञासूंना साधना सांगायचे. त्यांना काही वेळा सेवेसाठी कित्येक मैल चालावे लागायचे. बाबांनी विदेशात चांगल्या ओळखी करून प्रचार केला.
२ ऊ. बाबांना घरातील सर्व गोष्टी सांगितल्यावर माझे मन शांत होते. ‘ते अडचणींवर काहीतरी उपाय काढतील’, असा मला विश्वास वाटतो.
२ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले कौतुक : एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘‘काकांचा (श्री. मनोहर राऊत यांचा) पुष्कळ त्याग आहे ना !’’
२ ऐ. बाबांमध्ये जाणवलेला पालट : बाबांनी पुष्कळ प्रयत्न करून स्वतःत पालट केले आहेत. आता त्यांच्यामध्ये प्रेमभाव आणि स्वीकारण्याचा भाग पुष्कळ वाढला आहे.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२९.७.२०२१)
सौ. अंजली राऊत (वय ६० वर्षे) यांची त्यांची स्नुषा सौ. समृद्धी राऊत यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. शिकण्याची वृत्ती
‘आईंच्या (सासूबाईंच्या) माहेरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे शिक्षण अधिक झालेले नाही; पण त्यांच्यातील गुणांमुळे त्या अनेक गोष्टी शिकू शकल्या.
२. स्वीकारण्याची वृत्ती
आईंना सासरी अनेक जणांचे करावे लागायचे, तरी त्यांनी बाबांकडे (यजमानांकडे) त्याविषयी कधीच गार्हाणे केले नाही. बाबांनी साधनेला आरंभ केल्यावर आईंनी त्यांना कधी विरोध केला नाही. त्यांनी बाबांना संसारात आणि सेवेत साथ देऊन साधना केली. त्या समोरच्या व्यक्तीचे बोलणे ‘समोरचा आपल्यासाठी चांगलेच सांगत आहे’, या भावाने ऐकतात आणि स्वीकारतात.
३. मुलांना पूर्णवेळ साधनेसाठी आश्रमात पाठवणे
आईंनी मुलांना कधी साधना आणि सेवा करण्यास विरोध केला नाही. आईंना साधना आणि सेवा यांचे महत्त्व समजल्यावर त्यांनी मुलांना पूर्णवेळ साधनेसाठी आश्रमात पाठवले. हा त्यांचा मोठा त्यागच आहे.
४. वर्ष २०१७ मध्ये आई रामनाथी आश्रमात सेवेसाठी आल्या. त्यानंतर त्यांच्यात चांगले पालट होत गेले.
५. सद़्गुरुंनी कौतुक करणे
एकदा आमच्या घरी सद़्गुरु स्वाती खाडये आणि सद़्गुरु अनुराधा वाडेकर आल्या होत्या. तेव्हा त्यांनी आईंनी केलेली देवपूजा पाहिली आणि म्हणाल्या, ‘‘पूजा पुष्कळ भावपूर्ण केली आहे.’’
– सौ. समृद्धी राऊत (स्नुषा), (२९.७.२०२१)