साधकांनो, साधनेतील आनंदाची तुलना कोणत्याही बाह्य सुखाशी होऊ शकत नसल्याने साधनेचे प्रयत्न तळमळीने करा आणि खरा आनंद अनुभवा !
‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवारी आणि रविवारी सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुटी घेतो. असे असतांना ‘या संदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती श्रेष्ठ ?’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले |
‘सेवा करत असतांना मध्येच काही साधकांच्या मनात ‘आता काही दिवस सेवेतून विश्रांती (ब्रेक) घेऊया, कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया’, असे मायेतील विचार येतात. हे विचार त्यांच्या प्रकृतीनुसार येत असतात किंवा साधनेतील अडचणी सोडवता न येणे, ताण घेणे, तसेच एखादी गोष्ट मनाप्रमाणे न झाल्यास ती स्वीकारता न येणे, यांमुळेही येतात. स्वभावदोष आणि अहं यांच्या अशा पैलूंमुळे साधकांना साधनेच्या प्रयत्नांतील आनंद घेता येत नाही. काही वेळा अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळेही साधकांच्या मनातील विचारांची तीव्रता वाढते.
अशा प्रसंगी सेवेतून सुटी घेऊन तात्कालीन सुख मिळवण्याचा विचार करण्यापेक्षा साधकांनी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. साधनेतील अडचणी सुटून साधकांचे प्रयत्न नियमित होऊ लागल्यास त्यांची सात्त्विकता वाढू लागते आणि रज-तम गुण न्यून झाल्याने त्यांच्या मनातील बाह्य आकर्षणाचे विचारही उणावू लागतात. अशा प्रकारे साधक साधनेतील आनंद अनुभवू लागतो. या आनंदाची तुलना कोणत्याही बाह्य सुखाशी होऊ शकत नाही. त्यामुळे साधनेचे प्रयत्न नियमित होण्यासाठी साधकांनी तळमळीने प्रयत्न करावेत. यासाठी त्यांनी उत्तरदायी साधकांचे साहाय्यही घ्यावे.
साधकांच्या मनात मायेतील विचारांची तीव्रता आणि वारंवारता अधिक असल्यास त्यांनी यासाठी स्वयंसूचना घ्याव्यात. अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे असे विचार वाढले असल्यास नामजपादी उपाय वाढवावेत.
साधकहो, मायेतील गोष्टींतून मिळणार्या क्षणिक सुखापेक्षा सेवेतील आनंद अनंत पटींनी श्रेष्ठ असल्याने स्वतःला गुरुसेवेत झोकून द्या !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०२३)