काँग्रेसचा राजकीय अंत आवश्यक !
क्रांतीकारकांविषयीचा द्वेष नसानसांत भिनलेल्या काँग्रेसला आता राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी देशभक्तांनी कंबर कसणे आवश्यक झाले आहे. पाणी डोक्यावरून गेले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ब्रिटनच्या दौर्यावर असतांना केंब्रिज विश्वविद्यालयात मार्गदर्शन करतांना त्यांनी भारतीय लोकशाहीवर आणि सरकारवर टीका केली होती. याला टीका म्हणण्यापेक्षा खोटारडेपणा म्हणणे अधिक सयुक्तिक वाटेल. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतही ‘संसदेचा सदस्य आहे, हे दुर्दैव आहे’, असे विधान केले आणि नंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्या सांगण्यावरून त्यावर सारवासारव केली. यातून हे स्पष्ट होते की, राहुल गांधी यांची खासदारकी रहित करण्याचीच आवश्यकता आहे. काँग्रेसला बुडवण्याचे काम राहुल गांधी ‘इमाने इतबारे’ करत असतील, तर ते देशभक्तांना आवश्यकच आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये. त्यामुळे राहुल गांधी यांचे ‘हे’ कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी आता देशभक्तांनी हातभार लावणे आवश्यक आहे. ‘राहुल गांधी यांनी लोकशाहीविषयी केलेल्या विधानांवरून त्यांनी क्षमा मागावी’, असे संसदेत भाजपच्या खासदारांकडून मागणी केली जात आहे. यावर काँग्रेसकडून ट्वीट करण्यात आले आहे. हे ट्वीट वाचून प्रत्येक देशभक्त आणि धर्माभिमानी हिंदू यांच्या तळपायातील आग मस्तकात गेल्याविना रहाणार नाही. ‘सावरकर समजलात का ? नाव राहुल गांधी आहे’, असे ट्वीट करण्यात आले आहे. याचा सर्वच स्तरांवरून विरोध होण्यासह राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे नोंद होणे आवश्यक आहे. राहुल गांधी यांची तुलना सावरकरांशी कदापि होऊ शकत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्याने अवमान करणार्या काँग्रेसला आता धडा शिकवणे आवश्यक ठरले आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी टीका करतांना थेट ‘घोडे आणि गाढव’ अशी तुलना केली आहे. ‘कुठे सावरकर ? तर कुठे राहुल गांधी ?’, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. शिशुपालचे १०० अपराध भरल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र सोडून त्याचा वध केला. आता काँग्रेसच्या या ट्वीटनंतर ‘तिची १०० पापे भरली आहेत’, असेच लक्षात घेऊन काँग्रेसचा राजकीय अंत करण्याचीच वेळ आली आहे.
केवळ लांगूलचालन !
विदेशात जाऊन भारतीय लोकशाहीची थट्टा करायची, निवडून आलेल्या सरकारवर परदेशात जाऊन वाट्टेल ते आरोप करायचे, क्रांतीकारकांचा अवमान करायचा, हे काँग्रेसचे आणि राहुल गांधी यांचे धंदे बंद करणे आता अपरिहार्य आहे. पहिल्या टप्प्यात राहुल गांधी यांची खासदारकी रहित केली पाहिजे. त्यांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे. देहली पोलीस अन्य एका प्रकरणात राहुल गांधी यांच्या चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोचले होते. आता पुढचीही प्रक्रिया जलद करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कारावास भोगला, तसा गांधी घराण्यातील कुणीही कारावास भोगलेला नाही. तो आता राहुल गांधी यांना भोगायला त्यांच्या कर्माने भाग पाडल्याचे त्यांना दाखवून देणे आवश्यक झाले आहे. आता त्यांना कोलू चालवावा लागणार नाही किंवा त्यांना चाबकाचे फटके मारता येणार नाहीत, तरी त्यांच्याकडून अन्य कामे करवून घेतली पाहिजेत. यातून त्यांना सावरकरांनी काय भोगले, हे थोडेतरी लक्षात येईल. ‘सावरकर यांनी क्षमा मागितली’, असे काँग्रेस जे सातत्याने म्हणत असते, त्यावर असंख्य वेळा स्पष्टीकरण देण्यात आले आहे; मात्र मुसलमानांना आणि पुरो(अधो)गाम्यांना खुश करण्यासाठी काँग्रेस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ज्या राहुल गांधी यांच्या आजी आहेत, त्यांनी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतुक करत सावरकरांच्या नावे टपाल तिकीट प्रकाशित केलेले आहे. असे असतांना राहुल गांधी आणि काँग्रेस त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यातून लक्षात घ्यायला हवे की, ‘आम्ही सुधारणार नाही’, असेच त्यांना सांगायचे आहे. अशांना आता सुधारण्याच्या भानगडीत न पडता त्यांचे राजकीय अस्तित्वच संपवणे योग्य ठरणार आहे. म्हणजे काँग्रेसला कधी क्षमा मागावी लागणार नाही किंवा राहुल गांधी पुन्हा संसदेत निवडून जाणार नाहीत.
कठोर कायदा हवा !
हिंदूंच्या देवता, क्रांतीकारक, राष्ट्रपुरुष आदींचा गेल्या अनेक वर्षांपासून विविध माध्यमांतून अवमान केला जात आहे. त्याविरोधात कठोर कारवाई व्हावी, या संदर्भात कठोर कायदा करावा, अशी मागणीही सातत्याने केली जात आहे; मात्र याविषयी सरकार गंभीर नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सातत्याने होणार्या अवमानावरून तरी आता सरकारने याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. आता कायदा करतांना थेट सावरकर यांच्या नावाचाच उल्लेख करत त्यांचा कुणी अवमान केला, तर त्यांना किमान काही वर्षे तरी कारागृहात खडी फोडत घालवावी लागतील, असे करावे लागणार आहे. अॅट्रॉसिटीप्रमाणेच आता हा कायदा करण्याची आवश्यकता आहे. यामुळे काँग्रेसचे नेते किंवा अन्य कुणीही सावरकर आणि अन्य क्रांतीकारक यांचा अवमान करण्यास धजावणार नाहीत. देवता, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक आदींचा सन्मान राखण्यासाठी लहान मुलांना शाळेतूनच शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पाठ्यपुस्तकांतून क्रांतीकारकांचा इतिहास दडपण्यात आला. त्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल गेली. आता हे सर्व पालटून अधिकाधिक त्यांची माहिती देऊन भावी पिढीमध्ये त्यांचा आदर निर्माण केला पाहिजे. काँग्रेसने यापूर्वी श्रीरामाचे अस्तित्व नाकारत रामसेतू तोडण्याचा घाट घातला. हेही लक्षात घेत हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या विरोधातही कठोर होत त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती शाळा आणि महाविद्यालये यांतून शिकवणे आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढीमध्ये देवतांविषयी अधिक भाव निर्माण होईल.
राहुल गांधी यांचा सावरकरद्वेष पहाता त्यांच्यावर पोलिसी कारवाई करणेच आवश्यक ! |