छत्रपती संभाजी महाराजांच्या यशाचे गमक – साधना !
२१ मार्च २०२३ या दिवशी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन’ आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
‘छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र आज साहसकथा स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शंभूराजांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात यश कशामुळे आले, तो त्यांच्या साधनेचा, म्हणजे त्यांनी जगून दाखवलेल्या अध्यात्माचा भाग दुर्लक्षित केला जातो. यासंबंधी विविध मान्यवरांचे विवेचन येथे दिले आहे.
१. पुत्रकामेष्टी यज्ञ करणारे धर्मज्ञ छत्रपती संभाजी महाराज !
‘शिवयोगी, केशव आणि गेशभट यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना तुळजेची किंवा देवाची उपासना करण्यास सांगितले. छत्रपती संभाजी महाराज शिवयोग्याला मान आणि दान देत असत. शिवयोग्याच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजी महाराज यांनी पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ करून बराच दानधर्म केला होता. लहानपणापासून छत्रपती संभाजी महाराजांना पुराणाची आवड होती. त्यांच्या विद्वत्तेमुळेही त्यांना ‘पंडितराव’ म्हटले असणे शक्य आहे. केशव पंडितांनी आपल्या ‘राजारामचरितम्’ या काव्यात छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन ‘सकलशास्त्र विचारशील आणि धर्मज्ञ शास्त्रकोविद’ असे केले आहे.’
(साभार : ‘संभाजीराजांचे धार्मिक धोरण’, ‘शिवपुत्र संभाजी’, लेखक – डॉ. (सौ.) कमल गोखले)
२. देवतांचे स्तवन आणि धर्मशास्त्राचा अभ्यास
‘छत्रपती संभाजीराजांनी लिहिलेल्या ‘बुधभूषण’ या ग्रंथाचे ३ भाग आहेत. पहिल्या भागात पूर्वजांचा त्रोटक इतिहास, भवानीमातेचे आणि अन्य देवतांचे स्तवन अन् आशीर्वादरूपी संस्कृत वचने आहेत. दुसर्या भागात मत्स्यपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, कामदकीय नीतीसार यांतील वचने आहेत. तिसर्या भागात संकीर्ण माहितीचा संग्रह आहे.’
(साभार : ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’, लेखक – डॉ. जयसिंगराव पवार)
३. शंभूराजांचे व्यक्तीमत्त्व अध्यात्मवादीच !
‘जीवनाच्या अंतिम क्षणी शरिरावर अन् मनावर भयंकर आघात होत असतांनासुद्धा स्थितप्रज्ञाच्या आत्मिक बलाने छत्रपती संभाजी महाराज संकटांशी मुकाबला करू शकले. याचे कोडे छत्रपती संभाजीराजांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अध्यात्मवादी शक्तीच्या आविष्काराने सुटू शकते.
व्यसनाधीन माणूस एवढ्या प्रचंड आत्मिक बलाने उभा राहूच शकत नाही; कारण व्यसन हे केवळ शरिरच नव्हे, तर मनही दुबळे बनवत असते.’
(साभार : ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’, लेखक- डॉ. जयसिंगराव पवार)
४. शाक्त पंथीय साधना करण्यामागील छत्रपती संभाजी महाराजांचा उद्देश !
‘‘बाळाजीकाका, मनुष्याच्या शुद्ध आचरणासाठीच प्रत्येक धर्म आणि पंथ झटत रहातात. पुढे स्वार्थासाठी काही जण धर्माला वेठीस धरून वाममार्गाचा अवलंब करतात; परंतु धर्मपंथाला आलेले विपरित स्वरूप म्हणजे मूळ धर्म नसतो. त्यामुळे शाक्त पंथियांमध्ये वाममार्ग संचारला आणि वैदिक जातीधर्माला त्याची लागणच झालेली नाही, असे समजणे मोठे धारिष्ट्याचे ठरेल !’’, असे शंभूराजे बोलले. संभाजीराजे पुढे सांगू लागले, ‘‘शाक्त पंथ आमच्या लेखी दुसरे तिसरे काहीही नसून ती जगन्मातेची म्हणजे शक्तीची पूजा आहे ! त्यात आम्हा भोसल्यांची कुळमाता म्हणजे तुळजाभवानी आहे. ती शस्त्रधारी, दुष्टांचे निर्दालन करणारी आहे. तिला नैवेद्यच लागतो तोच मुळी रक्तामांसाचा !’’ बोलता बोलता शंभूराजे अडखळले; दाटल्या कंठाने बोलले, ‘‘आज आमचे गुन्हे नसतांनाही अनेकांच्या दुष्ट, कुत्सित नजरा आम्हाला भोवतात. अनेकांच्या शिव्याशापांचे, तळतळाटाचे आम्ही धनी ठरतो. अशा दुष्ट शक्तींशी मुकाबला करायचा, तर कुणाच्या तरी वरदहस्ताची, आशीर्वादाची आवश्यकता लागतेच बाळाजीकाका.’’
(साभार : ‘संभाजी’, लेखक – श्री. विश्वास पाटील)
५. छत्रपती संभाजीराजांची स्थुलातून सूक्ष्माकडे प्रगती !
‘धैर्य हा छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्यसाधारण विशेष गुण असला, तरी त्यांचीही स्थुलाकडून सूक्ष्माकडे अशी उत्तरोत्तर उत्क्रांती झालेली दिसून येईल. बालपणी औरंगजेबाची मल्लयुद्धाची आज्ञा त्यांनी ठोकरून लावली, ते बालसुलभ निसर्गसिद्ध (constitutional) धैर्य होते. अकबराला आश्रय देऊन औरंगजेबाला त्यांनी आव्हान दिले, ते तारुण्यातील उद्दाम धैर्य होते. पुढे ७ वर्षे त्यांनी अनेक शत्रूंविरुद्ध प्राणपणाने झुंज दिली, ते विराचे धैर्य होते आणि अखेरच्या क्षणी शस्त्र, सैन्य, राज्य एवढेच नव्हे, तर त्यांचे डोळेसुद्धा त्यांच्यापासून हिरावून घेतल्यावर त्यांनी मृत्यूला तोंड दिले, ते त्यांचे हुतात्म्याचे धैर्य होते ! छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्म्याची अशा चढत्या क्रमाने उत्क्रांती ज्या क्षणी पूर्ण झाली, त्याच क्षणी त्याला खाली ओढणारे पार्थिवतेचे बंध गळून पडले आणि ते मुक्त झाले !’ (साभार : ‘छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ’, लेखक – प्रा. श.श्री. पुराणिक)’
छत्रपती संभाजी महाराजांचे अमरत्व औरंगजेबालाही मान्य !‘आपल्या साथीदारांनी चालवलेल्या त्या प्रशंसेचा पातशहाला (औरंगजेबाला) उबग आला. तो चालता चालता थबकला. त्याला दम लागल्यासारखा झाला. खरे बोलावे कि बोलू नये ? त्याच्यातील कठोर शासक आपल्या पापण्यांच्या दरवाजावर कडा पहारा देत होता; परंतु त्याच्या मनाच्या तळघरात, खोलवर वास करणारा मनुष्यप्राणी द्रवला. त्यानेच पातशहाचा घात केला. डोळ्यांच्या बाहुल्याआड भरून आलेल्या आसवांच्या बुधल्यांना तडे गेले. पातशहाच्या पहार्याची पर्वा न करता त्याच्या डोळ्यांतून हळूच दोन-तीन अश्रू खाली ओघळले. गालावरून ते त्याच्या पांढुरक्या दाढीत झिरपले. औरंगजेब उदासवाण्या सुरात बोलला, ‘‘अरे बेवकूफो, कैसा जश्न मना रहे हो ? (अरे मूर्खांनो, कसला उत्सव साजरा करता) जिसने कत्ल किया वो मर गया और जिसका कत्ल हुआ वो तो अमर हो गया !! (मारणारा मेला आणि मेलेला अमर झाला !)’’ (साभार : ‘संभाजी’, लेखक – श्री. विश्वास पाटील)’ |
हिंदु धर्मासाठी अतुलनीय आत्मबलीदान करणारे छत्रपती शंभूराजे ! – स्वातंत्र्यवीर सावरकर‘आपल्या रानटी शत्रूंच्या समोर हताश राजबंदी करून छत्रपती संभाजी महाराजांना आणले असतांनाही ते (संभाजीराजे) ताठ उभे राहिले आणि जीवनाचे मोल घेऊनही आपला धर्म विकावयाचे त्यांनी स्पष्ट नाकारले. मरण टाळण्यासाठी धर्मांतर करावयाची कल्पना त्यांनी त्वेषाने धिक्कारली आणि आपल्या पूर्वजांच्या धर्माविषयीच्या निष्ठेचा पुनर्घोष करून त्यांनी आपल्या मुसलमानी छलकांवर, त्यांच्या धर्मशास्त्रावर आणि विचारसरणीवर अपमानांचा अन् शिव्याशापांचा वर्षाव केला. ‘मराठी सिंहाला आपला पाळीव कुत्रा करणे अशक्य आहे’, असे पाहून औरंगजेबाने या ‘काफरा’चा वध करण्याविषयी आज्ञा दिली; पण या धमकावणीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रावर थोडाच परिणाम होणार होता ! तापवून रक्त केलेल्या सळ्यांनी आणि सांडसांनी त्यांचे डोळे भोसकून बाहेर काढण्यात आले; त्यांच्या जिभेचे क्रमशः तुकडे तुकडे तोडण्यात आले; पण या राक्षसी छळानेही त्या राजहुतात्म्याच्या धैर्याचा भंग झाला नाही. अंती त्याचा शिरच्छेद करण्यात आला. मुसलमानांच्या धर्मवेडाला तो बळी पडला; पण त्याने हिंदुजातीला अक्षय्य उज्ज्वलता आणून दिली. या एक आत्यंतिक चळवळीचे आत्मरूप जसे विशद करून दाखवले, तसे दुसरेे कशानेही दाखवणे शक्य नव्हते ! छत्रपती संभाजीराजांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने छत्रपती शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती केवळ नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्ज्वल आणि बलशाली केली ! हिंदु धर्मासाठी आत्मबलीदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले.’ (साभार : ‘हिंदुपदपादशाही’, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर) |
संपादकीय दृष्टिकोनस्वतः साधना करून आत्मबळाद्वारे हिंदु धर्मासाठी आत्मबलीदान करणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीरच’ ! |