सोलापूर रेल्वेस्थानकात बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू करावे !
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाअंतर्गत रेल्वे प्रशासनाला निवेदन
सोलापूर, २० मार्च (वार्ता.) – प्रवाशांना अल्प दरात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भारतभरातील विविध रेल्वेस्थानकांवर ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ बसवल्या आहेत. सोलापूर रेल्वेस्थानकात ५ वॉटर व्हेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत; मात्र या सर्व मशीन बंद आहेत. त्या तात्काळ चालू करण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर) यांना देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील सचिव एच्. ताजुद्दीन यांनी स्वीकारले. या वेळी कर सल्लागार श्री. गणेश वास्ते, श्री. रमेश पांढरे, आनंद चौगुले, नितीश बोगा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ट्विटर हँडल @surajyacampaign द्वारे बंद मशीनचे छायाचित्र प्रसारित करून दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
१. आय.आर्.सी.टी.सी.च्या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक झाले होते; मात्र त्यावर आता ‘आऊट ऑफ ऑर्डर’ नोटीस चिकटवली आहे.
२. मार्च २०२२ मध्ये पश्चिम आणि मध्य रेल्वे अधिकार्यांनी असा दावा केला होता की, ते अकार्यक्षम ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ पालटतील; मात्र रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ व्ही.के. त्रिपाठी यांनी प्रसारित केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, भारतीय रेल्वेने कोरोना काळातील दळणवळण बंदीपासून रेल्वेस्थानकांवर बंद असलेल्या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ पुन्हा चालू न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेस्थानकांवर केवळ आमच्या पिण्याच्या पाण्याच्या नळांवर पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे १ लिटर बाटलीबंद पाणी १५ रुपयांना विकत घेण्याविना प्रवाशांना पर्याय नाही.
३. प्रवाशांपेक्षा कॅन्टीन आणि खाद्यपदार्थ यांचे स्टॉल यांना लाभ व्हावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे दिसते, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
‘वॉटर व्हेंडिंग मशीन’च्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करा !रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच त्यावर त्वरित उपाययोजना काढावी यासाठी आपल्या भागांतील रेल्वेस्थानकांतील बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ची छायाचित्रे, स्थानकाचे नाव, प्लॅटफॉर्म क्रमांक आदी ‘@RailwaySeva’ @RailMadad’ यांना ट्वीट करावीत, तसेच ‘सुराज्य अभियानच्या ‘@Surajyacampaign’ या ‘ट्वीटर हँडल’ला टॅग करावे. या संदर्भात http://railmadad.indianrailways.gov.in/ या लिंकवर प्रवासी तक्रारही करू शकतात. |
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? रेल्वे प्रशासन यासंदर्भात स्वतःहून कृती का करत नाही ? |