रुग्णालयातील सेवा सुरळीत ठेवण्यासाठी शासन रोजंदारीवर कर्मचारी घेणार !
मुंबई – जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य व्यवस्थेला बसत आहे. त्यामुळे ढासळणारी आरोग्य व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी रोजंदारीवर कर्मचारी घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचारी घेऊन रुग्णांना सेवा देण्याचे आदेश आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी दिला आहे.
राज्यात ठिकठिकाणी आधुनिक वैद्य, परिचारिका, तसेच आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने रुग्ण सेवेत अडथळे येत आहेत. शस्त्रक्रिया रखडलेल्या असून रुग्णांवर उपचार करतांनाही सरकारी रुग्णालयातील व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. परिणामी ढासळणारी आरोग्य व्यवस्था सावरण्यासाठी, तसेच रुग्ण सेवेत कुठेही बाधा येऊ नये. तसेच विनाअडथळा आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पर्यायी मनुष्यबळाचा वापर करण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
जे.जे., जीटी, कामा आणि सेंट जॉर्जेस या रुग्णालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या राज्य सरकारच्या रुग्णालयांतील आंतररुग्ण सेवा आणि शस्त्रक्रिया यांवर परिणाम झाला आहे. त्याचपाठोपाठ आता बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येत घट होत आहे.