गुढीपूजनाचा पूजनातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. हिंदूंच्या नववर्षारंभानिमित्त (गुढीपाडव्यानिमित्त) (६.४.२०१९ या दिवशी) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विधीवत गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी गुढीचे पूजन केले आणि अन्य एका साधकाने पौरोहित्य केले. ‘गुढीपूजनाचा पूजक, पुरोहित, पूजेतील घटक आणि पूजनाच्या वेळी उपस्थित असणारे साधक यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात गुढीपूजन करतांना श्री. ईशान जोशी (गुढी गोलात दाखवली आहे.)

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत गुढीपूजनापूर्वी आणि पूजनानंतर गुढी, कडुनिंबाचा प्रसाद, पूजक, पुरोहित अन् पूजनाला उपस्थित ३ साधिका (तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली १ साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेली १ साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची १ साधिका) यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘गुढीवर लावलेल्या तांब्याच्या कलशात दुसर्‍या दिवसापासून प्रतिदिन पाणी ठेवून ते प्यावे’, असे सांगितले आहे. ‘गुढीवर लावलेल्या तांब्याच्या कलशात पाणी ठेवल्याने त्या पाण्यावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी दुसर्‍या दिवशी त्या कलशात आश्रमातील पिण्याचे पाणी ठेवण्यापूर्वी आणि १ घंटा ते पाणी कलशात ठेवल्यानंतर त्या पाण्याच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. गुढीपूजनाचा पूजेतील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे : गुढीपूजनापूर्वी पुरोहित आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा होती. गुढीपूजनानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी झाली. गुढीपूजनानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि अन्य घटकांतील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

१ आ. तांब्याच्या कलशात दुसर्‍या दिवशी १ घंटा पाणी ठेवल्यानंतर पाण्याच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : आश्रमातील पिण्याच्या पाण्यामध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा अन् तिची प्रभावळ ३.५६ मीटर होती. ते पाणी तांब्याच्या कलशात १ घंटा ठेवल्यानंतर त्या पाण्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ३.३८ मीटर वाढ होऊन ती ६.९४ मीटर एवढी झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. गुढीमध्ये आरंभीही पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे आणि गुढीपूजनानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे, यामागील कारण : सनातनच्या आश्रमातील सात्त्विक वातावरण, गुढीवर लावण्यात आलेले सर्व घटक सात्त्विक असणे (उदा. गुढीची काठी, गुढीचे वस्त्र, हार, कडुनिंबाची डहाळी इत्यादी) आणि साधकांनी पूजनाची सर्व सिद्धता भावपूर्ण करणे, यांमुळे गुढीमध्ये पूजनापूर्वीच पुष्कळ सात्त्विकता निर्माण झाली. त्यामुळे गुढीमध्ये पूजनापूर्वीही पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

चैत्र शुक्ल प्रतिपदेला (म्हणजे गुढीपाडव्याला) ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात. पूजकाने गुढीचे भावपूर्ण पूजन केल्याने गुढीमध्ये ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी (चैतन्य) पुष्कळ प्रमाणात आकृष्ट झाल्या. त्यामुळे गुढीपूजनानंतर गुढीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

२ आ. कडुनिंबाच्या प्रसादामध्ये प्रजापति-लहरी (चैतन्य) आकृष्ट होणे : गुढीपाडव्याला कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण करतात. हा प्रसाद कडुनिंबाची पाने, जिरे, हिंग, भिजलेली चण्याची डाळ आणि मध यांपासून बनवतात. इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडुनिंबात प्रजापति-लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण करतात. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या प्रसादामध्ये प्रजापति-लहरी आकृष्ट झाल्याने गुढीपूजनानंतर कडुनिंबाच्या प्रसादाच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

२ इ. पूजक, पुरोहित आणि पूजनाला उपस्थित साधिका यांनी गुढीपूजनातून निर्माण झालेले चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्यातील सात्त्विकता वाढली.

२ ई. तांब्याच्या कलशातील पाण्यावर प्रजापति-लहरींचा (चैतन्याचा) संस्कार होणे : चैत्र शुक्ल प्रतिपदेला (म्हणजे गुढीपाडव्याला) ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वांत जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात. गुढीवर लावलेल्या कलशावर प्रजापति-लहरींचा संस्कार झालेला असतो. त्यामुळे दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे. प्रजापति-लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच प्रकारचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति-लहरी प्राप्त होतात. गुढीवर लावलेल्या तांब्याच्या कलशात दुसर्‍या दिवशी १ घंटा पाणी ठेवल्यानंतर त्या पाण्यावर प्रजापति-लहरींचा संस्कार झाल्याने पाण्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली.

थोडक्यात ‘हिंदु धर्मात विशिष्ट तिथीला विशिष्ट सण साजरे करण्यामागे अध्यात्मशास्त्र आहे. ते समजून घेऊन भावपूर्ण कृती केल्यास त्यातून आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो,’ हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.१०.२०१९)

ई-मेल : mav.research2014@gmail.com  

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.