मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांची ४ वर्षांची यशस्वी वाटचाल ! – प्रदेश भाजप
पणजी – गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तम कामगिरीची ४ वर्षे पूर्ण केली आहेत, असे कौतुकोद्गार प्रदेश भाजपने काढले आहेत. याविषयी अधिक माहिती देतांना भाजपच्या माध्यम विभागाने म्हटले आहे –
१. वर्ष २०१२ मध्ये डॉ. प्रमोद सावंत आमदार म्हणून प्रथमच सांखळी मतदारसंघातून निवडून आले.
२. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी त्यांना गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. डॉ. प्रमोद सावंत यांनी उपाध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली.
३. वर्ष २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला केवळ १३ जागा मिळाल्या, तरीही भाजपने मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीनंतर झालेल्या युतीतील घटक पक्षांच्या समर्थनाने राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी पडले आणि १७ मार्च २०१९ या दिवशी त्यांचे निधन झाले.
४. भाजपच्या नेतृत्वाने डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास ठेवून १७ मार्च २०१९ या दिवशी त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री केले.
५. डॉ. प्रमोद सावंत यांच्या कुशल नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिंकल्या आणि १ लोकसभेची जागा जिंकली.
६. वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले. स्वत: डॉक्टर असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन गोव्यातील लोकांना कोरोना महामारीच्या विरोधात लढण्यासाठी साहाय्य केले. या कठीण प्रसंगी त्यांनी एवढे धाडस दाखवले की, त्यांनी स्वत: इतर डॉक्टरांसह गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित राहून कोरोनाच्या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
७. वर्ष २०२२ मध्ये डॉ. प्रमोद सावंत यांच्या कुशल नेतृत्वाखाली भाजपने फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत २० जागा जिंकल्या आणि ते गोव्याचे दुसर्यांदा मुख्यमंत्री बनले.
डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला भारतातील सर्वांत विकसित राज्य होण्यासाठी आवश्यक बळ आणि धैर्य त्यांना लाभो, हीच सदिच्छा !