महाराणी येसूबाई यांची समाधी सापडली !
सातारा, १८ मार्च (वार्ता.) – हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि हिंदवी स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी अन् हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या मातोश्री महाराणी येसूबाई यांची समाधी सापडली आहे. ‘जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्था’ आणि ‘महाराणी येसूबाई फाउंडेशन, सातारा’ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही समाधी सातारा येथील संगम माहुली येथे असल्याचे समोर आले आहे. याविषयी दोन्ही संस्थांकडून पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली.
महाराणी येसूबाई यांची समाधी संगम माऊली येथे आहे. या ठिकाणी ‘येसूबाईचा घुमट’ असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत आढळून येतो. याविषयी ज्येष्ठ इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांनी वर्ष १९७० च्या त्यांना उपलब्ध झालेल्या साधनांवरून ही समाधी नदीपात्रात शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी त्यांनी उत्खननही केले होते; मात्र त्यामध्ये ठोस काही आढळून न आल्यामुळे तो प्रयत्न तेथेच सोडून देण्यात आला. नंतरच्या काळात अनेक इतिहास संशोधक आणि अभ्यासक यांनी या समाधीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नगर येथील वस्तूसंग्रहालयाचे सुरेश जोशी यांनी बेंद्रे यांचे मत खोडून काढण्याचा प्रयत्न करतांना खंड्या कुत्र्याच्या समाधीजवळ महाराणी येसूबाई यांची समाधी असावी, असा निष्कर्ष काढला होता; मात्र ठोस पुरावे नसल्यामुळे हे सिद्ध होऊ शकले नाही.
वर्ष २००५ मध्ये ‘जिज्ञासा इतिहास संशोधन आणि संवर्धन संस्थे’च्या वतीने या समाधीची शोधमोहीम हाती घेण्यात आली. अनुमाने ६ वर्षांपूर्वी संगम माऊली येथील हरिनारायण मठाच्या एका मोडी लिपीतील कागदपत्रांत सर्वप्रथम समाधीचा ‘येसूबाईचा घुमट’, असा स्पष्ट उल्लेख आढळला होता; परंतु समाधीचे स्थान निश्चित होत नव्हते. सापडलेली कागदपत्रे आणि हरिनारायण मठाच्या जागेची स्थान निश्चिती करतांना चतु:सीमा दाखवतांना आढळलेला ठोस पुरावा यांवरून ही समाधी महाराणी येसूबाई यांचीच आहे, हे निश्चित करता आले.