दूध भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, दुग्धविकास मंत्री
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – अन्न आणि औषध प्रशासनाकडे ‘आरे’ दूध संघाकडील कर्मचारी वर्ग वळवून दूध भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सदस्य हरिभाऊ बागडे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला ते उत्तर देत होते.
विखे-पाटील म्हणाले की, येणार्या काळात दूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाईन सिद्ध करण्यात येईल. या हेल्पलाईनवर ग्राहकांना दूध भेसळीविषयी तक्रार करता येईल. सध्या राज्यात ७० टक्के दूध संकलन हे खासगी क्षेत्राकडून आणि ३० टक्के दूध संकलन हे सहकारी क्षेत्राकडून केले जात आहे. जागतिकीकरण आणि खुल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दुधाचे शुल्क हे बाजारातील मागणी अन् पुरवठा यांवर अवलंबून आहे. खासगी क्षेत्रातील दूध व्यावसायिक आणि त्यांच्या वतीने खरेदी अन् विक्री करण्यात येणार्या दुधाच्या शुल्कावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. येणार्या काळात १ विशेष अभ्यासगट सिद्ध करून यामध्ये ग्रामीण भागातील प्रतिनिधी आणि या क्षेत्रातील तज्ञ घेऊन सहकारी दूध संघांना बळकटी देण्यासाठी काय करता येईल, याविषयी अभ्यास करण्यात येईल.
‘दिवाळीच्या वेळी दूध संघातील कर्मचार्यांना बोनस देणे हे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. अभ्यास गट सिद्ध करून सूचनांचा अभ्यास केला जाईल. दुधाच्या व्यावसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना दूध पावडर करून निर्यात करण्याची अनुमती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याविषयी अभ्यास केला जाईल’, असे विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यात दूध भेसळ करणार्यांना फाशीच्या शिक्षा द्यावी ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते
मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे साम्राज्य पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहान मुलांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. दूध भेसळ करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणार्यांना फाशी देण्याची तरतूद करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना केली, तसेच ‘दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करून ती निर्यात करण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली.