महिला सन्मान योजनेचा लाभ घ्यावा ! – रेश्मा गाडेकर, सातारा बसस्थानक आगारप्रमुख
सातारा, १८ मार्च (वार्ता.) – विधीमंडळात झालेल्या निर्णयानुसार एस्.टी.च्या प्रवासात महिलांसाठी तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयावर १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून कार्यवाही करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये ५ वर्षांच्या मुली ते ७५ वर्षांपर्यंतच्या महिला यांनी या ‘महिला सन्मान योजने’चा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा बसस्थानक आगारप्रमुख रेश्मा गाडेकर यांनी केले आहे.
रेश्मा गाडेकर पुढे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एस्.टी. प्रवासात महिलांसाठी तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती; मात्र या निर्णयावर कार्यवाही केव्हा होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या योजनेचा लाभ सामान्य एस्.टी.पासून शिवशाही, शयनयन (स्लीपर कोच) एस्.टी.मधून प्रवास करणार्या मुली आणि महिला यांना घेता येणार आहे. तसेच यापुढे ज्या नवीन एस्.टी.ची निर्मिती होणार आहे, त्यामध्येही या योजनेचा लाभ मुली आणि महिला यांना मिळणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुर्बल आर्थिक घटकांसाठी शासनाचा हा निर्णय नवसंजीवनी देणारा ठरला आहे.