चिंचवड (पुणे) रेल्वे स्थानकाजवळील आनंदनगरमधील १ सहस्र ४०० घरगुती वीजचोर्‍या उघड !

‘महावितरण’ची धडक कारवाई; नवीन वीजजोडणीची मागणी वाढली

पिंपरी (जिल्हा पुणे) – चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील आनंदनगरमध्ये ‘महावितरण’ने २ दिवस वीजचोरीच्या विरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये अंदाजे १ सहस्र ४०० घरगुती वीजचोर्‍या उघडकीस आल्या आहेत. (एवढ्या अवैध वीजजोडण्या होईपर्यंत महावितरणचे अधिकारी झोपले होते का ? – संपादक) वीज चोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. पुन्हा चोरी होऊ नये, यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये ‘एरियल बंच केबल’ टाकण्यात येणार आहे, असे ‘महावितरण’कडून समजते. आनंदनगर येथील ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्याची पहाणी करतांना आकडे टाकून वीजचोर्‍या होत असल्याने अतीभारित होऊन रोहित्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. ‘महावितरण’कडून त्वरित कारवाई करत टाकलेले सर्व आकडे काढून टाकण्यात आले. या मोहिमेच्या वेळी ‘महावितरण’कडून वीजमीटर काढून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही वीजचोरी होत असल्याचे दिसून आले. कारवाई केलेल्या वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत थकबाकीपोटी अनुमाने ६० सहस्र रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच नवीन वीजजोडणीची मागणीही वाढली असल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.