२८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्याने शिंदे गटाचे नामोनिशाणही रहाणार नाही ! – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला सिद्ध दिसत आहे; परंतु अजून १ वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही रहाणार नाही, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी १७ मार्च या दिवशी येथे माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली. ते राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, एकदा भाजप महाराष्ट्रात निवडणुका लढवेल आणि महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भाजप असेल, शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही. शिंदे गट रहाणार कि नाही ? हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच. यदाकदाचित राहिला, तर भाजप सर्व्हे करेल. घोषित केलेल्या ४८ जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या ५-६ जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल.