कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या अडवून ठेवलेल्या गायींची त्वरित सुटका करावी ! – जयंत पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
विधानसभेतून…
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – कर्नाटक राज्यातील चिंतामणी कोलार येथे गेलेल्या बारामतीमधील शेतकर्यांनी खरेदी केलेल्या गायी अडवून ठेवल्या आहेत. कर्नाटकचे सरकार एकीकडे ‘महाराष्ट्र सरकारला क्षमा करता येणार नाही’, असे म्हणत दुसरीकडे शेतकर्यांच्या गायी अडवून उद्दामपणा करत आहे. याविषयी ‘राज्य सरकारने गंभीर नोंद घेऊन कारवाई करावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली.
महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सातत्याने अपशब्द वापरण्याचे काम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून केले जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. निवडणूक जवळ येत असताना महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत आगपाखड करणाऱ्या कर्नाटक सरकारची गांभीर्याने दाखल घ्यावी.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 17, 2023
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील बारामती येथील ७० शेतकरी गायी खरेदी करण्यासाठी कर्नाटक राज्यातील चिंतामणी कोल्हार येथे गेले होते. त्यांनी गायी खरेदी केल्या आणि परतत असतांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाड्या अडवून त्यांच्याकडून ५ सहस्र रुपयांची पावती फाडण्याची मागणी केली; मात्र शेतकर्यांनी याला विरोध केला असता त्यांच्याशी बाचाबाची आणि हुज्जत घालून सर्व गाड्या कर्नाटकातील तुमकूर येथील पोलीस ठाण्यात अडवून ठेवल्या आहेत. या सर्व प्रकारात एका गायीचा मृत्यू झाला आहे. ‘७० शेतकरी आणि गायी यांना त्वरित राज्य सरकारने सोडण्याची कार्यवाही करून कर्नाटकला योग्य शब्दात समज द्यायला पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली.