वर्ष २०२१ मधील महाशिवरात्रीच्या दिवशी ध्यानाच्या वेळी साधकाने अनुभवलेले शिवलोकातील वातावरण !
१. वर्ष २०२१ मधील महाशिवरात्रीच्या दिवशी ध्यान करत असतांना सूक्ष्मातून शिवलोक दिसून शिवलोकातील वातावरण अनुभवणे
‘११.३.२०२१ या दिवशी (महाशिवरात्रीच्या दिवशी) सकाळी ९.३० वाजता मी ध्यानाला बसलो होतो. त्या वेळी अकस्मात् मला शिवलोकाचे दृश्य दिसले. मी ‘प्रत्यक्षात शिवलोकात आलो आहे’, असे मला जाणवले. ‘माझ्यासमोर प्रत्यक्ष शिव ध्यानस्थ बसला आहे’, असे मला दिसत होते. शिवलोकात मला नंदीदेवाचेही दर्शन झाले. मला त्या ठिकाणचे वातावरण पुष्कळ चैतन्यदायी वाटत होते. मला वातावरणात थंडावा जाणवत होता.
२. शिवलोकात बसून ध्यान करणे
शिवलोकात मला एक रिक्त जागा दिसली. मी भगवान शिवाला वंदन करून त्या जागेवर बसण्याची अनुमती मागितली. त्या ठिकाणी उपस्थित नंदीदेवाने मला त्या ठिकाणी बसायला सांगितले. ध्यानाची वेळ संपल्यावर मी भगवान शिव आणि नंदीदेव यांना नमस्कार केला.
३. नंतर ‘माझा लिंगदेह शिवलोकातून हळूहळू खाली पृथ्वीवर येत आहे’, असे मला जाणवले. ‘तो लिंगदेह पृथ्वीवर आश्रमात मी ज्या ठिकाणी ध्यानाला बसलो होतो, त्या ठिकाणी आला’, असे मला जाणवले.
४. मला त्या वेळी पुष्कळ गहिवरून आले. मी भगवान शिव आणि नंदीदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ही अनुभूती आली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. महेंद्र राठोड (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(१४.३.२०२१)
|