‘भक्ती’चेच कवच हवे !
नंदगाव (कोल्हापूर) येथील सीमा सुरक्षा दलात सैनिक म्हणून सेवारत असणार्या सौ. वर्षाराणी पाटील या स्वतःच्या १० मासाच्या मुलीला सोडून पुन्हा देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर गेल्या. या कृतीतून त्यांनी ‘मातृभूमीच्या रक्षणासाठी मातृत्वाचा त्याग करणारी रणरागिणी’, अशी ओळख निर्माण करून प्रत्येक स्त्रीच्याच नव्हे, तर पुरुषांच्या समोरही एक ‘देशप्रेमा’चा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. कर्तव्याला प्राधान्य देत ‘राष्ट्र प्रथम’ अशी भूमिका जेव्हा एखादी स्त्री निभावते तेव्हा तिचे देशासाठी किती प्रेम आहे, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. यामुळेच आज सामाजिक माध्यमांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
(सौजन्य : Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स)
बाळाला आणि कुटुंबियांना सोडून जातांना जरी त्यांना अश्रू अनावर झाले असले, तरी मातृत्व अन् कर्तव्य यांचा मेळ राखत सौ. वर्षाराणी पाटील यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले, हे विशेष आहे. त्यामुळे महिला या नेहमीच आदर्श आहेत. त्यांना एकाच पातळीवर नाही, तर अनेक पातळीवरची लढाई लढावी लागते. प्रत्येक महिला ही एक आई, पत्नी आणि बहीण असते. महिला ही ‘शक्ती’ आहे. शक्तीविना काहीच होत नाही. त्यामुळेच ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असतेच’, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार्या राजमाता जिजाऊ होत्या, स्वतः बाळाला पाठीवर घेऊन लढणारी झाशीची राणी होऊन गेली; काही झाले तरी शरिराला परपुरुषाचा स्पर्श होता कामा नये, यासाठी सहस्रो महिलांना घेऊन जोहार करणारी राणी पद्मावती होऊन गेली. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्त्रियांनी स्वतःचे जीवन समर्पित केले आहे. त्यामुळे आपण भारताचा इतिहास पाहिल्यास स्त्रीने नेहमीच स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा अनेक क्षेत्रांत उमटवला आहे. प्रत्येक परिस्थितीवर मात करून त्यामध्ये ती विजयीच झाली आहे. आताही पालटत्या काळानुसार स्त्रिया अनेक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने आहेत.
असे असतांनाही महिला कुठेतरी असुरक्षित आहे. तिच्यावर अन्याय आणि अत्याचार वाढत आहे. या सर्वांतून मुक्त होण्यासाठी महिलांनी स्वतःतील ‘शक्ती’ जागृत करण्याची वेळ आली आहे. यासाठी ‘धर्माचरण करून भक्ती वाढवणे’ आवश्यक आहे. ज्याप्रमाणे द्रौपदीला कठीण प्रसंगात वाचवण्यासाठी श्रीकृष्ण आला, तसे प्रत्येक स्त्रीने सर्व गोष्टींसमवेत स्वतःतील भक्ती वाढवणे आवश्यक आहे. भक्तीचे कवच कुणीही भेदू शकणार नाही, हे नक्की !
– वैद्या (सुश्री) माया पाटील, देवद, पनवेल.