चिपळूण येथे भूमीच्या वादातून झालेल्या गुन्ह्याचा ८ वर्षानंतर लागला निकाल
मित्राचा गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी ६ जणांना जन्मठेप !
रत्नागिरी – चिपळूण येथे भूमीच्या वादातून मित्राचा गळा चिरून निर्दयपणे हत्या केल्या प्रकरणी ६ जणांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी १० सहस्र रुपयांचा दंड अन् दंड न भरल्यास आणखी ६ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
वर्ष २०१५ मध्ये ही घटना घडली होती. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये दीपक वामन आंब्रे, उमेश चंद्रसेन आंब्रे, विक्रमसिंह भागसिंग मेश्राम, सागर पाटील, संदीप हरिश्चंद्र आंब्रे, उमेश नारायण आंब्रे यांचा समावेश आहे.
माहितीनुसार खेड तालुक्यातील आवाशी-देऊळवाडी येथील ओंकार तुकाराम कदम यांचा ३१ मे २०१५ या दिवशी हत्या झाल्याचे समोर आले होते. याची तक्रार त्याचा भाऊ समीर कदम याने चिपळूण पोलीस ठाण्यात केली होती. या हत्ये प्रकरणी चिपळूणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी यांनी अन्वेषण केले होते.
निकालाच्या वेळी १ आरोपी अनुपस्थित असल्याने त्याला अटक करण्याचे आदेश या वेळी न्यायालयाने दिले. चिपळूण सत्र न्यायाधीश एन्. एस्. मोमीन यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून अधिवक्ता प्रफुल्ल साळवी यांनी न्यायालयापुढे युक्तीवाद केला.