सुधीर पारदुले यांना २ दिवसांची पोलीस कोठडी
साई रिसॉर्ट वादग्रस्त प्रकरण !
दापोली – तालुक्यातील साई रिसॉर्ट वादग्रस्त प्रकरणी उद्योजक सदानंद कदम, प्रांताधिकारी जयराम देशपांडे आणि आता तत्कालीन बुरोंडी विभागाचे मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांना १५ मार्च या दिवशी येथील पोलिसांनी अटक केली आहे. पारदुले यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुरुड येथील मूळ भूमीमालक विभास साठे यांना ही सी.आर्.झेड. क्षेत्र येणारी जागा बिनशेती करून देण्यात आली. त्या वेळी दापोली तालुक्यातील महसूल विभागाच्या बुरोंडी मंडलमधील असलेले तत्कालीन मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांच्यावर येथील पोलिसांनी यापूर्वीच गुन्हा नोंद केला होता. या सर्व वादग्रस्त प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांच्यावरती ठेवण्यात आला आहे.
बिनशेती अनुमती संबंधीचा चुकीचा अहवाल बनवणे, सी.आर्.झेड. ‘नो डेव्हलपमेंट झोन’ असतांनाही सी.आर्.झेड. भंग या संदर्भात चुकीचा अहवाल देणे. अशा स्वरूपाचे आरोप तत्कालीन मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांच्या विरोधात ठेवण्यात आले आहेत.