वीजदेयक ठराविक टप्प्यात भरण्याची सुविधा देण्याविषयी विचार चालू ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री
वीजदेयक न भरल्याने अनेक गावांतील पाणीपुरवठा योजना बंद
मुंबई – पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग यांच्या वतीने गावात पाणी पुरवठा करण्यासाठी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना चालू केल्या जातात. या योजना पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायती यांच्याकडे त्या वर्ग केल्या जातात; मात्र या योजनेचे वीजदेयक अनेक ग्रामपंचायती भरत नसल्याने वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे येणार्या काळात वीजदेयक ठराविक टप्प्यात भरण्याची सुविधा देण्याविषयी विचार करण्यात येईल, असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला मंत्री पाटील यांनी उत्तर दिले.
या वेळी मंत्री पाटील म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यातील भोसे आणि ३९ गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या अंतर्गत ११ जुलै २०१४ या दिवशी प्रशासकीय मान्यता मिळाली. ही योजना जून २०१७ मध्ये पूर्ण होऊन फेब्रुवारी २०२० पर्यंतच्या काळात सर्व गावांना सुरळीत पाणी पुरवठा होत होता. नंतरच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली; मात्र संबंधितांनी या योजनेची वीजदेयके न भरल्याने ही योजना बंद पडली. वीजदेयक भरल्यास पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी योजना चालू करण्यात येणार आहे.