सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुकृपेने स्वतःमध्ये आमूलाग्र पालट झाल्याचे अनुभवणारे फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) !
फाल्गुन कृष्ण दशमी (१७.३.२०२३) या दिवशी फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत यांचा ६२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.
(भाग १)
श्री. मनोहर राऊत यांना ६२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘श्री. मनोहर राऊत यांना लहानपणापासूनच देवाची आवड आहे. ते सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्यांना योग्य साधना समजली. त्यांनी साधना चालू केल्यावर काही दिवसांतच त्यांना असलेल्या अयोग्य सवयी दूर झाल्या. या लेखात आपण श्री. मनोहर राऊत यांचा सनातन संस्थेशी झालेला संपर्क आणि त्यांनी केलेल्या विविध सेवांविषयी जाणून घेऊया.
१. लहानपणापासून शिवाची भक्ती करणे
‘माझी आई शिवाची भक्ती करायची. मीही लहानपणापासून भगवान शिवाची भक्ती करत होतो. मला वाचता येऊ लागल्यावर मी ‘काशीखंड’ ग्रंथाचे वाचन करू लागलो. तेव्हा ‘गुरुप्राप्ती झाल्याविना जीवनाचे सार्थक होेत नाही’, हे मला समजले. तेव्हापासून ‘मला गुरुप्राप्ती कशी होणार ?’, या विचारात मी असायचो. माझ्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती. काही वेळा मला उपाशी रहावे लागले आहे. ‘भगवान शिव मला या स्थितीतून बाहेर काढील’, अशी माझी श्रद्धा होती.
२. व्यवसायाच्या ताणामुळे दारू पिण्याचे व्यसन लागणे
त्यानंतर मी नोकरीसाठी मुंबईला आलो. अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर मी एक व्यवसाय चालू केला. व्यवसायात माझी पुष्कळ आर्थिक हानी झाली. व्यवसायाच्या ताणामुळे मला दारूचे व्यसन लागले. मी दारू प्यायल्याविना झोपू शकत नसे. मला कधीच शांत झोप लागत नव्हती. आमचे नातेवाईक माझ्या पत्नीला सांगायचे, ‘‘तुझा नवरा दारूमुळेच मरणार आहे. नंतर तुलाच ३ मुलांना सांभाळावे लागेल.’’
३. ‘सनातन संस्थे’शी संपर्क
३ अ. कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करू लागल्यावर एकच दिवसात शांत झोप लागणे : माझ्या एका मित्राचा भाऊ श्री. संजय मुरकुटे ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधना करायचा. त्याने मला कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करायला सांगितला. त्याप्रमाणे मी नामजप करू लागलो. तेव्हा एकच दिवस नामजप करून मला शांत झोप लागली.
३ आ. अनेक वर्षांपासून असलेले दारूचे व्यसन ‘सनातन संस्थे’च्या सत्संगात गेल्यावर पहिल्याच दिवशी सुटणे : माझ्या मित्राच्या भावाने मला ‘सनातन संस्थे’च्या सत्संगाविषयी माहिती दिली. सत्संगाला गेल्यावर मला ‘दारू पिणे अयोग्य आहे’, हे लक्षात आले आणि मी त्याच दिवशी ‘आता दारूला हातही लावायचा नाही’, असे ठरवले. मी सनातन संस्थेच्या सत्संगात गेल्यावर पहिल्याच दिवशी माझे अनेक वर्षांपासून असलेले दारूचे व्यसन सुटले. त्यानंतर आजपर्यंत माझ्या मनात दारू पिण्याचा विचारही आला नाही.
३ इ. सेवेला आरंभ
३ इ १. वर्ष १९९८ मध्ये मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करू लागलो.
३ इ २. ध्वनीफिती बनवणे आणि त्या साधकांपर्यंत पोचवणे : मी नेहमी ‘अजून कोणती सेवा करू ?’, असा विचार करत असे. काही दिवसांनंतर मला उत्तरदायी साधिका म्हणाल्या, ‘‘काका, तुम्ही ध्वनीफितींची (‘कॅसेट’ची) सेवा करू शकता का ?’’ तेव्हा मला या सेवेविषयी काहीच ठाऊक नव्हते, तरीही ‘देवाने सेवा दिली आहे, तर ती करायलाच हवी’, या विचाराने मी ती सेवा करू लागलो. आम्ही भजने, सत्संग यांविषयीच्या ध्वनीफिती बनवणे, त्या जिल्ह्यांत पोेचवणे, अशा सर्व सेवा करत होतो. आम्ही सर्व जण दिवस-रात्र ही सेवा करायचो. मोठा मुलगा ध्वनीफिती संबंधित साधकांकडे नेऊन देत असे. नंतर काही कालावधीने अन्य साधकही सेवेला येऊ लागले. काही दिवसांनी ही सेवा दुसर्या साधकांना देण्यात आली.
३ इ ३. ‘एअर इंडिया’ वसाहतीच्या भिंतीवर साप्ताहिक ‘सनातन प्रभात’विषयी लिहिण्यासाठी वसाहतीच्या अध्यक्षांची अनुमती घेण्यासाठी जातांना ‘गुरुदेवांनी खांद्यावर हात ठेवला आहे’, असे जाणवणे आणि अध्यक्षांची अनुमती घेऊन भिंतीवर ‘सनातन प्रभात’विषयी लिहिणे : एकदा उत्तरदायी साधकाने मला विचारले, ‘‘आपण साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू करत आहोत. तुम्ही ‘एअर इंडिया वसाहतीच्या भिंतीवर साप्ताहिक ‘सनातन प्रभात’विषयी लिहिता येईल का ?’, हे विचारून घ्या.’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘एकटे कसे जायचे ?’
त्या क्षणी ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सूक्ष्मातून माझ्या खांद्यावर हात ठेवला आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवले. मी लगेचच आमच्या संकुलाच्या अध्यक्षांकडे गेलो. मी त्यांना सनातन संस्थेविषयी सांगितले. मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही संकुलाच्या भिंतीवर साप्ताहिक ‘सनातन प्रभात’विषयी लिहायला अनुमती देऊन साहाय्य करावे.’’ तेव्हा ते म्हणाले ‘‘राऊत, तुम्ही आमचेच आहात आणि धर्मकार्यही आपलेच आहे. तुम्ही खुशाल भिंतीवर लिहू शकता.’’ नंतर आम्ही भिंतीवर साप्ताहिक ‘सनातन प्रभात’विषयी लिहिले.
३ इ ४. विविध ठिकाणच्या सेवांचे दायित्व मिळणे : पुढे मला सांताक्रूझ येथील सेवांचे दायित्व दिले. मी माझे दायित्व समजून घेतले आणि सेवा करू लागलो. त्यानंतर १ वर्षाने मला बांद्रा ते जोगेश्वरी येथील सेवांचे दायित्व मिळाले. मी ही सेवा ९ वर्षे केली.
३ इ ५. वर्सोवा गावाजवळ नवीन ठिकाणी केवळ२ घंट्यांमध्ये ५०० दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण होणे आणि ‘आपण काहीच करत नाही, गुरुमाऊलीच हे सर्व आपल्या साधनेसाठी करून घेत आहेत’, या विचाराने भाव जागृत होणे : एकदा आम्ही ‘वर्सोवा गावाजवळ नवीन ठिकाणी जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करूया’, असे ठरवले. तेव्हा मी सहसाधकांना विचारले, ‘‘किती दैनिक ‘सनातन प्रभात’ मागवूया ?’’ तेव्हा काही साधकांनी १००, काहींनी २०० अशी संख्या सांगितली. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘५०० दैनिक ‘सनातन प्रभात’ घ्यावेत.’ आम्ही ५०० दैनिक मागवले. दैनिक ‘सनातन प्रभात’ घेऊन आम्ही वर्सोवाहून होडीने पुढच्या गावामध्ये गेलो. तेथे गेल्यावर आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरण करायला आरंभ केला आणि देवाच्या कृपेने त्या सर्व दैनिकांचे २ घंट्यांमध्ये वितरण पूर्ण झाले. त्या वेळी ‘आपण काहीच करत नाही. गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉ. आठवले) हे सर्व आपल्या साधनेसाठी करून घेत आहेत’, या विचाराने माझा भाव जागृत झाला आणि माझी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
(क्रमशः)
– श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे), फोंडा, गोवा. (१६.१.२०२३)
‘श्री. मनोहर राऊत यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक अयोग्य सवयी होत्या. त्यांना त्यांच्या एका मित्राकडून सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेविषयी समजले. श्री. मनोहर राऊत यांनी लगेच नामजप करणे, सत्संगाला जाणे आणि सेवा करणे आदी गोष्टी चालू केल्या. ते पहिल्या सत्संगाला गेल्यानंतर ८ दिवसांतच त्यांच्या अयोग्य सवयी दूर झाल्या. यांतून सत्संग आणि सत्संगात सांगितलेल्या गोष्टी त्वरित कृतीत आणणे, यांचे महत्त्व अधोरेखित होते. श्री. मनोहर राऊत यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रियाही प्रामाणिकपणे राबवली. ‘व्यक्तीने योग्य साधना केल्यावर तिच्यात कसा पालट होतो !’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. मनोहर राऊत ! त्यांच्यातील ‘आज्ञापालन करणे आणि सेवेची तळमळ’, या गुणांमुळे ते कौतुकास पात्र आहेत. ‘त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होवो’, ही ईश्वरचरणी प्रार्थना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (१६.३.२०२३) |
|
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! – https://sanatanprabhat.org/marathi/663599.html