घरच्या घरी नैसर्गिक लागवड करतांना कराड (जिल्हा सातारा) येथील श्रीमती नलिनी सूर्यवंशी यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. ‘फांद्या लावल्या, तरी मोठ्या पानांचा बेल जगतो आणि लहान पानांचा बेल बिया लावल्यावर जगतो, हे शिकायला मिळणे : ‘बेलाचे रोप लावण्यासाठी मी एका काकूंकडे बेलाची फांदी मागितली. तेव्हा त्यांनी मला बेलफळ दिले. मी त्याच्या बिया वाळवून एका कुंडीत लावल्या. तेव्हा त्यांच्यापासून ३ रोपे आली. बेल मोठ्या आणि लहान पानांचा, असा २ प्रकारचा असतो. ‘फांद्या लावल्या, तरी मोठ्या पानांचा बेल जगतो आणि लहान पानांचा बेल बिया लावल्यावर जगतो’, हे मला यातून शिकायला मिळाले.
१ आ. ‘वडाचे झाड लावण्यासाठी कलम कसे सिद्ध करायचे ?’, हे शिकायला मिळणे : मी वडाच्या झाडाच्या २ फांद्या तिरक्या कापल्या आणि त्या एकत्र घट्ट बांधल्या. मी त्याचे कलम सिद्ध केले आणि कुंडीत लावले. काही दिवसांनी तेथे वडाचे रोप आले. तेव्हा ‘कलम कसे करायचे ?’, ते मला शिकायला मिळाले.
१ इ. एक मुलाने ‘अडुळशाच्या झाडाच्या फांद्या लावायच्या असतात’, असे सांगणे, एका काकूंनी गूळवेलीची काडी आणून देणे आणि त्यातून ‘अडुळसा आणि गूळवेल कसे लावतात ?’, हे समजणे : ‘गूळवेल आणि अडुळसा यांची लागवड कशी करायची ?’, हे मला ठाऊक नव्हते. मी घराजवळ सकाळी फिरायला गेले असता वाटेत एक मुलगा झाडाच्या फांद्या तोडत होता. मी त्याला विचारले, ‘‘हे कसले झाड आहे ?’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘हे अडुळसा आहे आणि याच्या फांद्या लावल्या की, त्या जगतात.’’ तेव्हा मी एक फांदी घरी आणून कुंडीत लावली. तसेच एका काकूंनी मला गूळवेलीची एक काडी आणून दिली. मी ती काडी लावली. तेव्हा मला अडुळसा आणि गूळवेल लावण्याची पद्धत शिकायला मिळाली.
१ ई. ‘कारले, दोडका, घेवडा, असे वेल भूमीवर पसरू न देता त्यांना मांडव करायचा असतो. त्यामुळे आपल्याला अधिक प्रमाणात फळभाजी मिळते’, हे माझ्या लक्षात आले.
१ उ. हळद, अळू आणि आले यांची लागवड करतांना शिकायला मिळालेली सूत्रे : हळद आणि अळू यांचा एक गड्डा लावला, तरी त्याला अनेक फाटे फुटतात अन् पुष्कळ प्रमाणात अळू आणि हळद येऊ शकते. आल्याचे तुकडे कुंडीत किंवा मोकळ्या जागेत लावले, तरी त्यांना अनेक फाटे फुटतात अन् पुष्कळ आले मिळते.
१ ऊ. मी कडूनिंबाचे एक रोप आणून लावले होते. त्यापेक्षा कडूनिंबाच्या बिया लावल्या, तर कडूनिंबाचे रोप चांगले येते.
१ ए. ‘प्लास्टिकच्या पिशवीत रोपांची लागवड करतांना पिशवीच्या तळाशी छिद्र पाडणे आणि रोपाला अल्प प्रमाणात पाणी देणे’, आवश्यक असणे : रोपांची लागवड करण्यासाठी मी प्लास्टिकच्या पिशवीत माती भरत असे; पण पाण्याचा निचरा होण्यासाठी पिशवीच्या तळाशी छिद्र पाडत नसे. त्यामुळे पिशवीत पाणी साठून रहात असे आणि रोप जगत नसे; तसेच मी रोप लावले की, त्याला भरपूर पाणी घालत असे. त्यामुळे रोप कुजत असे. तेव्हा ‘पिशवीत रोप लावण्यापूर्वी पिशवीला छिद्रे पाडली पाहिजेत आणि रोपांना अल्प प्रमाणात पाणी दिले पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले.
१ ऐ. रोपाला पालापाचोळ्याचे आच्छादन केले की, ते सुरक्षित रहाते.
२. आलेल्या अनुभूती
२ अ. ‘एखादे रोप कुणाकडे मिळेल ?’, असा विचार मनात आल्यावर परात्पर गुरुदेवांच्या कृपेने त्या व्यक्तीचे नाव सुचणे आणि त्या व्यक्तीला संपर्क केल्यावर ते रोप सहजगत्या मिळणे : मी गेली २ – ३ वर्षे रोपांची लागवड करण्याची सेवा करत आहे. या सेवेमुळे माझे चिंतन वाढले. ‘एखादे रोप मला कुणाकडे मिळेल ? ते कसे आणायचे ?’, असा विचार माझ्या मनात आला की, गुरुदेवांच्या कृपेने मला त्या व्यक्तीचे नाव सुचते आणि त्या व्यक्तीला संपर्क केला की, मला ते रोप सहजगत्या मिळते. ‘परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना शरण जाऊन आत्मनिवेदन केल्यावर आणि प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त केल्यावर आपण कोणतीही सेवा सहजपणे करू शकतो’, याची मला अनुभूती आली.
२ आ. ‘पिंपळाचे रोप लावायचे कि बी लावायचे ?’, हे ठाऊक नसल्याने या संदर्भात एका काकांना विचारल्यावर त्यांनी पिंपळाची २ मुळे आणून देणे आणि ती मुळे कुंडीत लावल्यावर त्यांना पाने येऊ लागणे : मला पिंपळाचे रोप लावायचे होते; पण ‘त्याचे बी लावायचे कि रोप लावायचे ?’, हे मला ठाऊक नव्हते. मी या संदर्भात एका काकांना विचारले असता त्यांनी मला पिंपळाची २ मुळे आणून दिली. मी ती मुळे कुंडीत लावली. थोड्याच दिवसांत ती फुटून त्यांना पाने येऊ लागली. तेव्हा ‘आपली इच्छाशक्ती तीव्र असेल, तर देव कुणाच्याही माध्यमातून ती इच्छा पूर्ण करतो’, हे मला अनुभवता आले.
‘लागवडीच्या सेवेतून परात्पर गुरुदेवांनी मला हे अनुभवायला दिले’, याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे. परात्पर गुरुदेवांनी माझ्याकडून करून घेतलेले प्रयत्न मी गुरुचरणी अर्पण करते.’
– श्रीमती नलिनी सूर्यवंशी, कराड, जिल्हा सातारा. (१६.१.२०२२)
नामजपाच्या चैतन्याचा परिणाम वनस्पतींवरही होत असल्याचे अनुभवता येणे
‘गुरुतत्त्व सतत आपल्या समवेत असते. ते आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून शिकवत असते. मागील २ वर्षांपासून मी कोरोना महामारीसाठी ‘श्री दुर्गादेवी, दत्त आणि शिव’ यांचा नामजप करत होते. त्या नामजपाचा परिणाम झाडांवर झाल्याचे मला अनुभवता आले.
१. लिंबाच्या झाडाला लिंबे पुष्कळ लागणे : मी एका ‘टब’मध्ये लिंबाचे रोप लावले होते. ४ वर्षे त्याला लिंबे येत नव्हती. मे मासात या रोपाला ३ फुले आली. नंतर ५ – ६ फुले आली आणि लिंबे लागू लागली. आता त्या झाडाला ५० ते ६० लिंबे लागलेली आहेत.
२. मी लावलेल्या जास्वंदीच्या झाडाला फुले येतात. त्या फुलांचा रंग पूर्वीपेक्षा अधिक लाल भडक झाला आहे. ती फुले देवाच्या चरणी वाहिली की, रात्री ८ वाजेपर्यंत टवटवीत असतात.
३. मी नामजपाला बसते, त्या खोलीच्या पुढच्या बाजूला अंजिराचे झाड आपोआप आले आहे. त्या झाडाला पुष्कळ अंजिरे लागतात. वर्षातून २ वेळा चांगला बहर येतो.
४. कारल्याच्या वेलीला पुष्कळ कारली लागणे आणि त्या कारल्यांना छान चव असल्याचे इतरांनी सांगणे : खोलीच्या मागच्या बाजूला मी कारल्याची एक वेल लावली होती. त्या वेलीला पुष्कळ कारली लागायची. शेजारी किंवा पाहुणे घरी आले, तर मी त्यांना कारली देत असे. ‘त्या कारल्यांना छान चव आहे’, असे मला त्यांनी सांगितले.’
– श्रीमती नलिनी सूर्यवंशी (१६.१.२०२२)
• इथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |