सातारा येथील श्रीमती माया शिंदे यांनी मुलीच्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी अनुभवलेली गुरुकृपा !
‘५.७.२०२२ या दिवशी माझी मुलगी चि.सौ.कां. शिवानी भरत शिंदे (आताची सौ. शिवानी चेतन देसाई) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) हिचा विवाह कराड येथे झाला. त्या वेळी विवाहापूर्वी आणि विवाहानंतरच्या कालावधीत मला साधकांचे पुष्कळ साहाय्य लाभले. याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. माहेरचे नातेवाईक दूर रहात असल्याने वेळ देऊ शकत नसतांना साधिकेला मुलीच्या विवाहाची सिद्धता करतांना ताण येणे
‘माझी मुलगी शिवानी हिचा विवाह निश्चित झाल्यावर ‘हा विवाह सोहळा कसा पार पडणार ?’, असा मला ताण आला होता. सातारा येथे आम्ही दोघीच रहात होतो. शिवानी १२ वर्षांची असतांनाच तिच्या वडिलांचे निधन झाले. मी खासगी नोकरी करत होते. मला वेतनही अल्प मिळत होते. आम्ही दोघींनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार काही दिवस पूर्णवेळ साधना केली होती. माझे माहेरचे नातेवाईक दूर रहात असल्याने ते मला वेळ देऊ शकत नव्हते. यामुळे विवाहाची सिद्धता करतांना मला ताण आला होता.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधक आणि काही नातेवाईक’ यांच्या माध्यमातून साहाय्य करणे
‘विवाह सोहळा आध्यात्मिक स्तरावर आणि निर्विघ्नपणे पार पडावा’, यांसाठी मी प्रार्थना करत होते. माझी गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) प्रत्येक प्रसंगी मला साहाय्य करत होती. शिवानीच्या विवाहासाठी काही नातेवाईक ४ दिवस आधी सातारा येथे आले होते. माझ्या मनात ‘त्यांची निवासाची व्यवस्था कशी करावी ?’, असा विचार येत होता. त्या वेळी गुरुमाऊलींच्या कृपेमुळे एका साधकाने त्याची ३ खोल्यांची सदनिका पाहुण्यांच्या निवासासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली. साधकांनी पाहुण्यांसाठी अंथरुण-पांघरूण उपलब्ध करून दिले. त्यांनी स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी आणि पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकचे पिंपही (‘बॅरल’) दिले.
३. ‘भगवंत प्रत्येक प्रसंगी समवेत आहे’, असे साधकांच्या माध्यमातून जाणवणे
माझ्या मनात ‘नातेवाईक आले नाहीत, तर विवाहविधी कसे करणार ?’, असा विचार येत होता. तेव्हा भगवंताने साधकांच्या माध्यमातून मला साहाय्य केले.
अ. विवाहस्थळी पाहुण्यांना पोचवणे, लग्नासाठी लागणारे साहित्य नेणे, यांसाठी साधकांनी त्यांची वाहने उपलब्ध करून दिली, तसेच साधकांनी पाहुण्यांना वेळेपूर्वी विवाह स्थळी पोचवण्याचे व्यवस्थित नियोजन केले.
आ. विवाहाला दोन्हीकडचे नातेवाईक आणि साधक उपस्थित होते. साधकांनी विवाह स्थळी नेलेल्या साहित्यांची मांडणी आकर्षक केली होती. साधक प्रत्येक ठिकाणी तत्परतेने स्वतःहून साहाय्य करत होते. त्यामुळे मला ताण आला नाही आणि मी शांत होते.
४. विवाह सोहळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना !
अ. विवाह सोहळ्याला संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यामुळे हा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.
आ. वधू-वरांसह सर्व साधकांचे एकत्रित छायाचित्र काढले. तेव्हा सर्व साधकांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी देतात, तशा घोषणा क्षात्रतेजाने दिल्या. त्यामुळे तेथील वातावरण भक्तीमय आणि शक्तीयुक्त झाले होते.
५. नातेवाइकांचा ‘सनातन संस्थे’विषयी असलेला अपसमज दूर होणे
अ. देवा, साधकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा आनंदमय आणि भक्तीमय वातावरणात पार पडला, ही तुझीच कृपा आहे. या विवाह सोहळ्यात नातेवाईक आणि साधक यांची जवळीक झाली. त्यामुळे नातेवाइकांना विवाह सोहळ्यात सामावून घेता आले. त्यांचा ‘सनातन संस्थे’विषयी असलेला अपसमज दूर झाला. त्यांच्या मनात ‘सनातन संस्थे’ची प्रतिमा उंचावली गेली.
आ. अनेक वर्षांपासून माझे नातेवाईक सनातनला विरोध करत होते. ते आम्हाला साधना करण्यासही विरोध करत होते. आता त्याच नातेवाइकांचा विरोध मावळला आहे. या विवाह सोहळ्यामुळे त्यांच्या मनात ‘सनातन संस्था’ आणि ‘साधक’ यांच्याविषयी जवळीक निर्माण झाली आहे.
६. नातेवाइकांनी ‘सनातन संस्था आणि विवाह’ यांविषयी व्यक्त केलेले मनोगत !
६ अ. साधकांनी घरचे लग्न समजून साहाय्य केले ! : माझ्या धाकट्या बहिणीच्या सासूबाईंनी (सौ. लीलावती गायकवाड (वय ६५ वर्षे) यांनी त्यांच्या मैत्रिणींना सांंगितले, ‘‘श्रीमंत लोकांची लग्ने चांगली होतातच; पण सामान्य स्थितीतील व्यक्तीचे लग्नही एवढे चांगले, थाटामाटात होऊ शकते’, असे मी प्रथमच पाहिले. ‘शिवानीला कुणाचा आधार नसतांना लग्नात कोण साहाय्य करणार ?’, असे मला वाटत होते; पण साधकांनी घरचे लग्न समजून मानपानाची अपेक्षा न करता साहाय्य केले.’’
५ आ. श्री. जयदीप गायकवाड (धाकट्या बहिणीचे यजमान) लग्नापूर्वी नवरदेवाला विवाहस्थळी घेऊन येत होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी साधक पारंपरिक पोषाखात उभे होते. ते पाहून त्यांना वाटले, ‘आपण गुरुपौर्णिमा किंवा हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या कार्यक्रमाला जात आहोत.’
५ इ. साधकांचा आधार वाटला : माझा भाऊ श्री. धीरज चवरे आणि वहिनी सौ. वर्षा चवरे यांना वाटले, ‘विवाह सोहळ्यात साधकांनी घरचाच कार्यक्रम समजून साहाय्य केले.’ त्यामुळे त्यांना साधकांचा आधार वाटला आणि चांगले वाटले.
५ ई. ‘माझी आई सौ. सिंधू चवरे (वय ६९ वर्षे) आणि वडील (श्री. मारुती चवरे (वय ७१ वर्षे) म्हणाले, ‘‘येथील सर्व साधक साहाय्याला आले’, हे बघून चांगले वाटले. ‘तुम्ही सर्व एकाच कुटुंबातील आहात’, असे आम्हाला वाटले.
६. विवाहानंतर अनेक साधकांनी ‘हा विवाह सोहळा आध्यात्मिक स्तरावर आणि भक्तीमय वातावरणात पार पडला’, असे प्रत्यक्ष भेटून अन् ‘व्हॉट्सअॅप’वरून कळवले.
७. विवाह सोहळ्यात साधिकेच्या आईला आलेली अनुभूती
७ अ. ‘हळदीचा कार्यक्रम चालू असतांना म्हाळसादेवी आणि खंडोबादेव यांच्या हळदीचा कार्यक्रम चालू आहे अन् विवाह सोहळा अन्य लोकात होत आहे’, असे जाणवणे : माझी आई म्हणाली, ‘‘हळदीचा कार्यक्रम चालू असतांना म्हाळसादेवी आणि खंडोबादेव यांच्या हळदीचा कार्यक्रम चालू आहे. विवाह सोहळा अन्य लोकात होत आहे. मी माझ्या नातीच्या (शिवानीच्या) लग्नाला आले नाही, तर देवाच्या लग्नाला आले आहे’, असे मला वाटले.’’
८. कृतज्ञता
‘गुरुमाऊली, मला आरंभी ‘शिवानीच्या लग्नाची सिद्धता आणि नियोजन करण्यासाठी कुणाचे साहाय्य घ्यायचे’, असे अनेक प्रश्न पडले. विवाह निश्चित करणे, विवाहाची सिद्धता करणे, प्रत्यक्ष विवाह सोहळ्यात सहभागी होणे, या सर्व प्रसंगांत तुम्हीच साधकांच्या रूपाने माझ्या समवेत उपस्थित राहून मला आधार दिलात. त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.
गुरुमाऊली, ‘साधक हेच आपले कुटुंब आहे’, असे तुम्ही सांगितले होते. ती ‘साधक कुटुंब संकल्पना’ मी या विवाह सोहळ्यात अनुभवली. तुम्ही मला या साधक कुटुंबात सामावून घेतलेत. त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्रीमती माया शिंदे, सातारा (७.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |