खरा सूत्रधार शोधून दोषींवर लवकरच कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार
मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी डिझायनर अनिक्षा आणि तिचे वडील यांच्या विरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यावर १६ मार्च या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणणारी ती महिला कोण आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी ‘मला अडचणीत आणण्यासाठीच हा प्रयत्न केला आहे’, असा दावा केला, तसेच यावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या प्रकरणी संबंधितांवर लवकरच कारवाई होईल; मात्र खरा सूत्रधार कोण हेही शोधले जाईल’, असे त्यांनी सांगितले.
My statement in Legislative Assembly on the news published in ‘Indian Express’ and on the question raised by LoP Ajitdada Pawar..
'इंडियन एक्सप्रेस' या दैनिकात प्रकाशित वृत्तासंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यावर विधानसभेत केलेले निवेदन…… https://t.co/XSmUSoIj3S pic.twitter.com/D5QLJJRBgI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 16, 2023
देवेंद्र फडणवीस म्हणाले,
‘‘अनिल जयसिंघानी हा इसम ७-८ वर्षांपासून पसार आहे. त्याच्यावर १४ ते १५ गुन्हे नोंद आहेत. त्याची एक मुलगी वर्ष २०१५-१६ च्या कालावधीत पत्नी अमृता हिला भेटत होती. नंतर अचानक तिचे भेटणे बंद झाले. वर्ष २०२१ मध्ये पुन्हा तिने पत्नीला भेटणे चालू केले, तेव्हा तिने ‘मी डिझायनर आहे. कपडे आणि दागिने बनवते’, असे सांगितले. विश्वास संपादन करण्यासाठी तिच्या आईचे एक पुस्तकही तिने प्रकाशित करून घेतले. एक दिवशी तिने सांगितले की, माझ्या वडिलांना काही चुकीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे, त्यांना सोडवा. त्यावर पत्नीने काही असेल, तर मला (देवेंद्र फडणवीस यांना) निवेदन देण्यास सुचवले. काही दिवसांनी तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी तिने १ कोटी रुपयांची लाच दिली; मात्र ‘चुकीचे अडकले असतील, तर पोलिसांकडून सोडवता येईल’, असे पत्नी अमृता म्हणाली; पण तिने सातत्याने बुकींचा विषय काढल्यावर पत्नीने तिला भ्रमणभाषवर ब्लॉक (संपर्क बंद करणे) केले. ब्लॉक केल्यावर २ दिवसांनी अनोळखी क्रमांकावरून काही व्हिडिओ आणि क्लिप आल्या. यातील एक व्हिडीओ गंभीर होता. त्यात ही मुलगी बाहेर कुठेतरी पिशवीत पैसे भरत आहे. दुसर्या व्हिडिओत ती मुलगी आमच्या घरातील महिला कर्मचार्याला पिशवी देतांना दिसत होती. नंतर पत्नीला त्या व्यक्तीने धमकी दिली की, हे व्हिडिओ आम्ही प्रसारित करू. माझे सर्व पक्षाशी संबंध आहेत. त्यामुळे आम्हाला साहाय्य करत तात्काळ खटले परत घेण्याची कारवाई करा.’’ ही गोष्ट पत्नीने सांगितल्यावर आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर तातडीने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.