सिंधुदुर्ग : प्रशासनाच्या आश्वासनानंतर वानोशी येथील पाण्यासाठीचे उपोषण स्थगित !
दोडामार्ग – तालुक्यातील धनगरवाडी, वानोशी (कुडासे) नळपाणीपुरवठा योजना ६ मार्च २०२३ या दिवशी वीजपुरवठा खंडित केल्याने बंद पडली होती. त्यामुळे ग्रामस्थ, तसेच प्राथमिक शाळा, अंगणवाडी यांचा पाणीपुरवठा बंद होऊन त्यांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांनी १३ मार्चला येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. सायंकाळी गटविकास अधिकार्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
नळपाणीपुरवठा योजना बंद पडण्यास सरपंच उत्तरदायी आहेत, असा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य अजय परब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. महिलांनी घागर मोर्चा काढून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. ‘८ दिवसांत याविषयी सभा घेऊन येाग्य तो निर्णय घ्यावा आणि नियमानुसार कार्यवाही करावी’, अशी लेखी सूचना गटविकास अधिकारी यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागणे, ही प्रशासनाची निष्क्रीयताच ! |