काणकोण (गोवा) समुद्रकिनार्यावर रात्री संगीतामुळे होणारे ध्वनीप्रदूषण थांबवावे ! – नागरिकांची पोलिसांत तक्रार
काणकोण, १५ मार्च (वार्ता.) – काणकोण समुद्रकिनार्यावर रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत लावल्याने, तसेच फटाके वाजवल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षेची सिद्धता करणार्या विद्यार्थ्यांना, तसेच आजारी माणसांना त्रास होत असल्याविषयीची तक्रार येथील एक नागरिक अभय धुरी यांनी पोलिसांकडे केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, ‘‘काणकोण समुद्रकिनार्यावरील राजबाग तारीर ते पाळोळे या भागांतील उपाहारगृहांतून मोठ्या आवाजात लावले जाणारे संगीत आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे सर्वसाधारण माणसांना रहाणे कठीण झाले आहे. आता १५ मार्चपासून बारावीची परीक्षा चालू झाली आहे आणि दहावीची मुले त्यांच्या परीक्षेची सिद्धता करत आहेत. त्यांना रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो; परंतु या ध्वनीप्रदूषणामुळे त्यांना अभ्यास करणे कठीण जात आहे. त्याचप्रमाणे आजारी आणि वृद्ध लोकांनाही याचा त्रास होत आहे. त्यामुळे पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करावी.’’
Canacona local petitions police over loud music being played at nighthttps://t.co/VPpEg4kBdi#TodayInTheGoan
— The Goan (@thegoaneveryday) March 15, 2023
अभय धुरी यांनी काणकोणचे आमदार आणि सभापती रमेश तवडकर यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रात म्हटले आहे, ‘‘समुद्रकिनार्यावरील उपाहारगृहांचे मालक मोठ्या आवाजात संगीत लावत आहेत. त्यामुळे संबंधित खात्यातील अधिकार्यांनी या उपाहारगृहांच्या मालकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती करत आहे.’’ अभय धुरी यांनी या पत्रांच्या प्रती काणकोण येथील उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि दक्षिण गोव्याचे उपअधीक्षक यांना पाठवल्या आहेत.
संपादकीय भूमिकानागरिकांना कर्कश संगीताचा त्रास होतो; तर मग पोलीस आणि प्रशासन यांना ते ऐकूही येत नाही का ? पोलीस आणि प्रशासन यांचे हात कुणी बांधलेले आहेत कि त्यांचे हात यात गुंतले आहेत ? |