वनांना लागलेल्या आगीच्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयात अहवाल सादर ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, १५ मार्च (वार्ता.) – गोव्यातील म्हादई अभयारण्यासह इतर ठिकाणच्या वनांना आग लागण्यासंदर्भातील अंतिम अहवाल पंतप्रधान कार्यालयात पाठवला असून त्या संदर्भात राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून पोचपावती आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
याविषयी ते म्हणाले, ‘‘म्हादई अभयारण्यातील साट्रे या गावात आग लागण्याची पहिली घटना घडली. त्यानंतर या अभयारण्यात इतर ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. त्याचबरोबर मोले आणि नेत्रावळी या इतर अभयारण्यांत आग लागण्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये पश्चिम घाटातील अनेक झाडे जळून खाक झाली. याखेरीज अनेक ठिकाणी शेतकरी काजूचे पीक मिळवण्याच्या अपेक्षेत असतांना काजूच्या बागायतीमध्ये आग पसरून या बागा जळून खाक झाल्या. सरकारने याविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.’’
वनमंत्री विश्वजित राणे म्हणाले, ‘‘ही आग कुणीतरी हेतूपूर्वक लावली असावी. यावर अजून काही स्पष्टीकरण देता येत नाही. आम्ही त्यावर पुष्कळ चर्चा केली आहे आणि आता अहवाल येईल.’’
मार्च मासाच्या पहिल्या १२ दिवसांत देशभरात वनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये ११५ टक्के वाढ झाली. ‘फेब्रुवारी मासात पाऊस न पडल्याने तापमान नेहमीपेक्षा अधिक होते’, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एफ्.एस्.आय्. (फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया) कडून उपग्रहाद्वारे केलेल्या वनाच्या सर्वेक्षणामध्ये १ मार्च ते १२ मार्च या कालावधीत संपूर्ण भारतात जवळपास ४२ सहस्र ७९९ ठिकाणी वनाला आग लागल्याचे आढळून आले आहे.