स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात याचिका !
कृष्णा नदीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या माशांचे प्रकरण
पुणे – कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे सहस्रो मासे मृत्यूमुखी पडल्याने ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे अध्यक्ष, तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील ‘राष्ट्रीय हरित न्यायालयात’ याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेमध्ये साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे. कृष्णा नदीपात्रामध्ये औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातून मळी मिश्रित पाणी विनाप्रक्रिया सोडले जात आहे. त्यामुळे जलचर संकटात आले आहे. सहस्रो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. तरीही यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीही कारवाई करत नाही, असे दिसते. केवळ ‘कारणे दाखवा’ अशी नोटीस औपचारिकपणा म्हणून काढण्यात येते, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.