भारतीय वाहनांची नावे स्वदेशीच हवी !
गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावरील वाहनांचे प्रमाण वाढले आहे. त्यातही चारचाकी वाहनाने प्रवास करणे सोयीचे असल्यामुळे सगळ्यांनाच वाटते की, आपल्याकडे चारचाकी गाडी हवी. तेव्हा काही वाहनांची नावे समोर येतात, जसे ओमनी, नॅनो, अल्टो, नेक्सॉन, हेक्सा, बलेनो आणि स्कॉर्पिओ इत्यादी. येथे विचार करायला लावणारी गोष्ट अशी की, वाहनांचे उत्पादन करणारी सर्व आस्थापने ही भारतीय आहेत; पण गाड्यांची नावे मात्र इंग्रजी भाषेतील आहेत. दुर्दैवाने फारच अल्प वाहनांची नावे भारतीय आहेत. यावरून असे लक्षात येते की, आपल्यावर असलेला पाश्चात्त्य विकृतीचा पगडा पुष्कळ खोलवर रुजलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरीही याची पाळेमुळे दिवसेंदिवस खोलवर रुजत आहेत, हे देशासाठी गंभीर आणि घातक आहे. यातून आपण इतके अभिमान शून्य का झालो आहोत ? अशा प्रकारे आपण स्वभाषाभिमान, देशाभिमान विसरून स्वतःचे पर्यायाने राष्ट्राची हानी करत आहोत, याचा विचार सर्वांनीच करायला हवा.
‘दिवसभर जे दिसते, ऐकतो त्याचा नकळत परिणाम आपल्या वृत्तीवर होत असतो, त्यानुसार विचार आणि वर्तन होत असते, असे मानसशास्त्र सांगते. व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्याही जडणघडणीत, उभारणीत स्वभाषेचे महत्त्व पुष्कळ मोठे आहे. प्रगत देशांनी हे महत्त्व ओळखले आहे; म्हणूनच जर्मनी, जपान, इटली, चीन, कोरिया आदी देशांनी त्यांच्याकडील वाहनांची नावे ही स्वभाषेतच ठेवलेली दिसतात. यातून भाषेच्या माध्यमातून अजूनही इंग्रज आपल्या मनोराज्यावर राज्य करत आहेत, असेच दुर्दैवाने म्हणावे वाटते.
आपले आपल्या राष्ट्र, संस्कृती, भाषा, धर्म यांवर प्रेम आणि स्वाभिमान हा असायलाच हवा. जो आपल्या राष्ट्राचा पाया आहे. यावर सूज्ञांनी अवश्य विचार करायला हवा. ‘नावात काय’ म्हणून सोडून न देता ‘नावातच सगळे आहे’, हे लक्षात घेऊन स्वदेशी आस्थापनांनी तरी किमान आपल्या वाहनांना स्वदेशी नावे द्यावीत. या छोट्या; पण महत्त्वाच्या प्रयत्नातून स्वभाषेला आणि पर्यायाने राष्ट्राला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यास साहाय्य होणार आहे. आपल्यात पुन्हा राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी आपण धर्माचरण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तेव्हाच आपले राष्ट्र बलशाली होईल हे खरे !
– सौ. प्रिया बागडदेव, छिंदवाडा