राज्‍यात एच्.३ एन्.२ आजाराने झालेल्‍या २ जणांच्‍या मृत्‍यूचा अंतिम अहवाल यायचा आहे ! – तानाजी सावंत, आरोग्‍यमंत्री

डॉ. तानाजी सावंत

मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – राज्‍यात एच्.३ एन्.२ हा विषाणू झपाट्याने पसरत असून या विषाणूमुळे आतापर्यंत नागपूर आणि नगर अशा ठिकाणी २ जणांचा मृत्‍यू झाला आहे. या रुग्‍णांना पूर्वीपासून इतरही अनेक व्‍याधी असल्‍याकारणाने त्‍यांच्‍या मृत्‍यूूचा अंतिम अहवाल आल्‍यानंतरच मृत्‍यूचे निश्‍चित कारण समोर येऊ शकेल, असे राज्‍याचे आरोग्‍यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी १५ मार्च या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

राज्‍यात एच्.३ एन्.२ या विषाणूमुळे नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण आहे. या विषाणूमुळे नगर येथे चंद्रकांत सकपाल या २३ वर्षांच्‍या वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍याचा मृत्‍यू झाल्‍याने त्‍याविषयी चिंता व्‍यक्‍त केली जात आहे. याविषयी आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत म्‍हणाले की, राज्‍यामध्‍ये ‘एच्.१ एन्. इ.’ आणि ‘एच्. ३२’ यांचे ९ मार्चपर्यंत २६९ रुग्‍ण होते. १२ मार्च या दिवशी हा आकडा ३५२ वर गेला आहे. म्‍हणजे नक्‍कीच यामध्‍ये वाढ झालेली आहे.

‘एच्. ३२’ या आजाराने चंद्रकांत सकपाल याचा मृत्‍यू झाल्‍याचे म्‍हटले जात असले, तरी अजूनही याविषयी अंतिम अहवाल येणे बाकी आहे. नगर, वडगाव येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील या वैद्यकीय महाविद्यालयाचा हा विद्यार्थी होता. परीक्षा संपल्‍यानंतर तो आपल्‍या मित्रांसमवेत अलिबाग येथे फिरायला गेला होता. त्‍यानंतर पुन्‍हा कॅम्‍पसमध्‍ये आल्‍यानंतर त्‍याला ताप आणि अंगदुखी जाणवू लागली. दुसर्‍या दिवशी त्‍यांच्‍या आई-वडिलांनी त्‍याला सरकारी रुग्‍णालयात भरती केले; परंतु १२ मार्च या दिवशी त्‍यांच्‍या कुटुंबाने त्‍याला नगर येथील साईदीप या खासगी रुग्‍णालयात हालवले. तेथे त्‍याचा १३ मार्च या दिवशी रात्री १२ वाजता मृत्‍यू झाला; परंतु चंद्रकांत सकपाल याला यापूर्वीही कोविड, एच्.३ एन्.२ असे अनेक व्‍याधी असल्‍याने त्‍याच्‍या मृत्‍यूचा अहवाल आल्‍यानंतरच मृत्‍यूचे नेमके कारण स्‍पष्‍ट होईल.