सकाळचा पहिला आहार पोटातील ‘मार्ग’ मोकळा असतांनाच घ्यावा !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६३
‘आपण वाहनाने जातांना वाटेत वाहनांची गर्दी नसेल, तर प्रवास सुखकारक होतो. याउलट वाहतुकीची कोंडी झाली, तर प्रवास कंटाळवाणा होतो’, हा अनुभव प्रत्येकानेच घेतलेला आहे. आहाराच्या संदर्भातही असेच असते. सकाळचा पहिला आहार घेण्यापूर्वी तोंडापासून गुदापर्यंतचा सर्व ‘मार्ग’ मोकळा असायला हवा. असे झाले, तरच आहाराचे उत्तम पचन होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकाळी शौचाला, तसेच लघवीला साफ होणे, खालून (गुदद्वारातून) वात सरणे, ढेकर आल्यास त्याला अन्नाचा वास नसणे, शरीर हलके असणे, घसा स्वच्छ असणे आणि सडकून भूक लागणे, ही पोटातील ‘मार्ग’ मोकळा असल्याची लक्षणे आहेत. ही लक्षणे निर्माण झाल्यावरच आहार घ्यावा.
वाहतुकीची कोंडी झालेली असतांना जवळच्या प्रवासासाठी चारचाकीपेक्षा दुचाकी किंवा सायकल चांगली पडते. या तत्त्वानुसार पोटातील मार्ग मोकळा नसतांना खाण्याचा प्रसंग आलाच, तर राजगिरा लाडू, लाह्या, भाजलेले पोहे, मुगाचे कढण (मूगडाळ शिजवून त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि गूळ घालून केलेला पदार्थ) यांसारखे पचायला हलके पदार्थ खावेत. याने तात्पुरते काम होते; परंतु दीर्घकालीन आरोग्यप्राप्तीसाठी, तसेच वर दिलेली पोटातील मार्ग मोकळा असल्याची लक्षणे निर्माण होण्यासाठी आयुर्वेदाच्या नियमांचे प्रतिदिन पालन करावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)
♦ या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या ♦ |