राज्यातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांच्या दुरवस्थेविषयी तत्परतेने कार्यवाही करण्यास सरकारकडून विलंब !
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतीगृहांतील स्वच्छता, भोजन, ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ आदींविषयी अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत; मात्र त्यांवर तत्परतेने कार्यवाही करण्यास सरकारकडून विलंब होत आहे. १५ मार्च या दिवशी विधान परिषदेत विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले.
राज्यात एकूण ४४१ वसतीगृहे असून त्यामध्ये ४३ सहस्र ३८८ विद्यार्थी आहेत. आतापर्यंत ५४ वसतीगृहांची पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये ४९ वसतीगृहांतील तक्रारींविषयी तथ्य आढळले आहे. या सर्व वसतीगृहांतील गृहपालांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यांतील २८ गृहपालांची विभागीय चौकशी लावण्यात आली असून ५ गृहपालांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सर्व वसतीगृहांची पडताळणी करून त्यामध्ये सरकारकडून दिल्या जाणार्या सुविधा दिल्या जात आहे कि नाहीत ? याविषयी पडताळणी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी सभागृहात दिली.
आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी राज्यातील शासकीय वसतीगृहात गृहपाल उपस्थित नसून तिथल्या नोंदणी चुकीच्या असतात व मुलींच्या वसतिगृहा मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या बाबत शासन काय उपाय योजना करणार आहे? (१/२)#MahaBudget2023 #MahaBudgetSession2023 pic.twitter.com/FmY99Z23r5
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) March 16, 2023
याविषयी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्यातील वसतीगृहांपैकी ५० टक्के वसतीगृहांत गृहपाल नसल्याचे, तसेच मुलींच्या वसतीगृहांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची तक्रार केली. आमदार अभिजित वंजारी यांनी अनेक वसतीगृहांमध्ये पिण्याचे पाणी, भोजनाचे पटल, प्रसाधनगृहे यांची दुरवस्था झाली असल्याचे सांगितले. आमदार अनिकेत तटकरे यांनी पडताळणी केलेल्या वसतीगृहांतील ९० टक्क्यांहून अधिक वसतीगृहांची दूरवस्था झाली असेल, तर सर्व वसतिगृहांतील पडताळणी केल्यास त्यांची स्थिती लक्षात येईल, असे म्हटले. त्यावर मंत्री संजय राठोड यांनी वसगृतीहातील पडताळण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे सांगितले.