साधकांनो, विविध घटनांविषयी मिळणार्या पूर्वसूचना आणि दिसणारी दृश्ये यांच्या संदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घेऊन त्यांचा साधनेच्या दृष्टीने लाभ करून घ्या !
‘काही साधकांना जागृतावस्थेत विविध दृश्ये दिसतात आणि पूर्वसूचना मिळतात. त्यांतील काही दृश्ये चांगल्या, तर काही वाईट घडामोडींशी संबंधित असतात. ‘अनिष्ट शक्ती दृश्ये दाखवत आहेत वा पूर्वसूचना देत आहेत’, असे वाटून साधकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. पुढील दृष्टीकोन लक्षात घेऊन अशा घटनांकडे पहाणे आवश्यक आहे.
१. ‘दिसलेल्या दृश्यांमधून भगवंत आपल्याला सावध करत आहे’, हे लक्षात घ्यावे !
काही वेळा पूर्वसूचनांप्रमाणे तंतोतंत जुळणार्या घटना प्रत्यक्ष जीवनातही घडतात. ‘भगवंताने त्या पूर्वसूचना देऊन वा दृश्ये दाखवून आपल्याला अगोदरपासूनच सावध केले आहे’, हे लक्षात घ्यावे.
एका साधिकेला ‘दुसर्या दिवशी करावयाच्या सेवेत अडचणी येतील. ती पूर्ण होण्यास कालावधी लागल्याने साधकांचा वेळ वाया जाईल’, असे दृश्य दिसले. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. प्रत्यक्षातही दुसर्या दिवशी सेवेत तशाच अडचणी आल्या आणि साधकांचा वेळ वाया गेला. या प्रसंगात साधिका स्वतःला दिसलेल्या दृश्याविषयी साधकांना सांगून सतर्क करू शकली असती. त्यामुळे साधकांचा वेळ वाचला असता.
२. सेवा परिणामकारक होण्यासाठी या पूर्वसूचनांचा लाभ होतो !
एका साधकाला ‘गुरुपौर्णिमेच्या सेवेच्या अंतर्गत आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत, ती देवीभक्त असून तिच्या कार्यालयामध्ये नामजपाच्या यंत्रावर नामजप लावला आहे’, असे दिसले. प्रत्यक्षातही नंतर त्या व्यक्तीला भेटायला गेल्यावर ती देवीभक्त असून तिच्या कार्यालयामध्ये नामजप चालू असल्याचे त्याच्या लक्षात आले. या दृश्यातून देवाने ती व्यक्ती देवीभक्त असल्याने तिच्यापर्यंत सनातनचे कार्य पोचवण्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यानुसार तिला भेटायला जातांना देवीविषयीची माहिती देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ घेऊन जाऊन अधिक परिणामकारक सेवा करता आली असती.
३. साधनेच्या अनुषंगाने पूर्वसूचना आणि दृश्य यांकडे पहावे !
वरील दोन्ही घटनांमधून ‘या पूर्वसूचना आणि दृश्य यांकडे साधनेच्या अनुषंगाने कसे पहायचे ?’, हे लक्षात येते. ‘ईश्वर आपल्या भल्यासाठी, म्हणजेच साधनेसाठी हे घडवत आहे’, असा भाव ठेवल्यास साधनेसाठी त्या घडामोडींचा लाभ करून घेण्याची दृष्टी मिळते. ‘आपल्या जीवनात जे काही घडते, त्यामध्ये अनावश्यक काही नसते’, हे लक्षात घ्यावे.
४. वाईट गोष्टींच्या संदर्भात पूर्वसूचना मिळत असल्यास काय करावे ?
वाईट गोष्टींच्या संदर्भात पूर्वसूचना मिळत असतील वा दृश्ये दिसत असतील, तर त्या संदर्भात नामजपादी उपाय करावेत. मिळालेल्या वाईट पूर्वसूचना श्रीकृष्णाच्या नामजपाच्या मंडलामध्ये लिहून ‘त्या घडू नयेत’, अशी प्रार्थना लिहावी. मंडल घातलेला कागद देवघरात किंवा ग्रंथामध्ये ठेवावा. वाईट दृश्य दिसत असल्यास ‘आपल्याभोवती विभूती फुंकणे, उदबत्ती लावणे आणि नामजप करणे’, असे उपाय करावेत. सर्वशक्तीमान ईश्वर सदैव आपल्यासह असल्याने अशा दृश्यांनी घाबरून जाऊ नये.
५. चांगल्या पूर्वसूचना मिळाल्यास ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी !
चांगल्या पूर्वसूचना किंवा दृश्य दिसल्यास ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. ‘मला पूर्वसूचना मिळतात’, याचा अहं वाटून देऊ नये. त्याऐवजी ‘त्या पूर्वसूचनांमधून ईश्वराला मला काय शिकवायचे आहे ?’ याचा अभ्यास करावा; तसेच पूर्वसूचना मिळण्याविषयी अपेक्षाही ठेवू नये. ईश्वरेच्छेने जे काही होईल, त्याला सामोरे जावे.’
– (सद़्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.२.२०२३)