‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग’ असणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेत संमत

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने तिच्या संसदेत एक विधेयक संमत करून ‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे म्हटले आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामधील मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून अमेरिकेने या विधेयकाद्वारे मान्यता दिली आहे.

१. संसदेत हे विधेयक आणणारे खासदार बिल हॅगर्टी आणि जेफ मर्केल यांनी म्हटले की, हे विधेयक अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग म्हणून स्पष्टपणे मान्यता देते. चीन वास्तविक नियंत्रणरेषेवरील (एल्.ए.सी.वरील) स्थिती पालटण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. आम्ही भारत आणि ‘क्वाड’ (जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया) देशांसमवेत आमची भागीदारी वाढवण्याच्या बाजूने आहोत, जेणेकरून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता निर्माण करता येईल. चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सतत धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने आपल्या सामरिक भागीदाराच्या पाठीशी आणि विशेषतः भारताच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.

२. या विधेयकात अमेरिकेने प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनच्या चिथावणीचा निषेध केला. चीनने सैनिकी बळाचा वापर करणे, वादग्रस्त भागात गावे उभारणे, स्थानिक शहरांना मंदारिन (चिनी) भाषेमध्ये नावे देणे आणि मानचित्रे (नकाशे) प्रकाशित करणे या गोष्टींचाही अमेरिकेने निषेध केला. भूतानमधील अनेक भागांना ‘चीनचा भाग’ म्हणून वर्णन करणे चुकीचे असल्याचे म्हटले.