पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अद्यापही अटक नाही !
इम्रान खान यांच्या सर्मथकांकडून त्यांच्या घराबाहेर हिंसाचार !
लाहोर / इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याचे प्रयत्न गेल्या २४ घंट्यांपासून पाकिस्तानचे पोलीस करत आहेत. पोलीस लाहोर येथील जमान पार्कमध्ये इम्रान खान यांच्या अटकेसाठी पोचलेले आहेत; मात्र त्यांच्या समर्थकांकडून होत असलेल्या हिंसारचारामुळे पोलीस इम्रान यांना अटक करू शकलेली नाहीत. इम्रान खान यांचा राजकीय पक्ष पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफचे (‘पीटीआय’चे) कार्यकर्ते हिंसक आंदोलन करत आहेत. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, तसेच पेट्रोल बाँबही फेकले. पोलीस अश्रुधुर आणि पाण्याचा फवारा यांद्वारे त्यांना नियंत्रणात आणत आहेत. यासाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर आणि ड्रोनही तैनात करण्यात आले आहेत.
Factbox: Fresh turmoil in Pakistan as former PM Imran Khan faces arrest https://t.co/NswcLtlQoE pic.twitter.com/3ONHcuJM0a
— Reuters Asia (@ReutersAsia) March 15, 2023
सरकारी तिजोरीतून (तोशाखानातून) मौल्यवान भेटवस्तू अल्प मूल्यात खरेदी करून कोट्यवधी रुपयांना विकल्याचा इम्रान खान यांच्यावर आरोप आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना २९ मार्चपर्यंत अटक करण्याचा आदेश दिला होता. इम्रान यांनी १८ मार्चपर्यंत संरक्षणात्मक जामीन घेतला आहे; मात्र पोलीस त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मला अटक करण्याची ‘लंडन योजना’ ! – इम्रान खान यांचा आरोप
इम्रान खान यांनी १५ मार्चला पहाटे एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझी अटक हा ‘लंडन योजने’चा एक भाग आहे. मला कारागृहात टाकणे आणि माझ्या पीटीआय पक्षाला नष्ट करणे, हा माझ्या विरोधकांचा मुख्य उद्देश आहे. त्यांना नवाझ शरीफ यांचे सर्व खटले संपवायचे आहेत. मला कारागृहात टाकण्याचा कायद्याशी काहीही संबंध नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. इस्लामाबादमध्ये माझ्यावर दोनदा आक्रमण झाले. माझ्या सुरक्षिततेमुळे मी उपस्थित होत नाही, हे न्यायालयाला ठाऊक आहे. मला कुठल्याही परिस्थितीत अटक करायचीच, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.