सिंधुदुर्ग : अंनिसच्या कार्यक्रमांना शाळांमधून कार्यक्रम घेण्यास अनुमती देणार्या अधिकार्यांची चौकशी करा !
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे मागणी
सिंधुदुर्ग – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आणि महाराष्ट्र शासनाचा ‘जादुटोणा विरोधी कायदा २०१३’ यांविषयी शाळांमधून विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या कार्यालयाकडून अनुमती देण्यात आली होती. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या कार्यक्रमांना अनुमती देतांना संबंधित अधिकार्यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांची सहमती घेतली होती का ? याची चौकशी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या गोंडस नावाखाली हिंदु धर्म, त्यातील चालीरिती, प्रथा-परंपरा, देवता, संत, धर्मग्रंथ यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याने राज्यात काही ठिकाणी वादग्रस्त प्रसंग निर्माण झाले होते. त्यामुळे तेथील संबंधित स्थानिक प्रशासनावर हे कार्यक्रम रहित करण्याची वेळ आली होती. त्यामुळे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जिल्ह्यातील शाळांतून उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने कार्यक्रम घेण्यास अनुमती दिल्याचे समजल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासन, तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक आणि माध्यमिक) यांना निवेदन देऊन या कार्यक्रमांना दिलेली अनुमती रहित करण्याची मागणी केली होती आणि या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचे पत्र समितीला द्यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे यांनी, ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आणि महाराष्ट्र शासनाचा ‘जादूटोणाविरोधी कायदा २०१३’ यांविषयी शाळांमधून विनामूल्य मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेण्यासाठी दिलेली अनुमती रहित केल्याचे पत्र हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांना पाठवले होते. त्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांची अनुमती न घेता परस्पर या कार्यक्रमांना अनुमती देण्यात आल्याचा संशय आल्याने समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांना निवेदन देऊन, ‘हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या कार्यक्रमांना अनुमती देणार्या अधिकार्यांची चौकशी करावी’, अशी मागणी केली आहे.
हिंदु जनजागृती समितीने दिलेले निवेदन –
याविषयीचे निवेदन प्रभारी (तात्पुरता पदभार सांभाळणारे) मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील यांना नुकतेच देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश दाभोळकर, श्री. परेश साटम आणि कुमारी प्रिया मिसाळ उपस्थित होते.