परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी १३३ कोटींच्या आराखड्यास मान्यता ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री
मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी १३३ कोटी ५० लाख रुपयांच्या आराखड्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे, तसेच केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याविषयी लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार याविषयीचा सविस्तर प्रस्ताव पर्यटन संचालनालयाच्या वतीने बीड येथील जिल्हाधिकार्यांकडून मागवण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १३ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.
प्रारंभी आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, पंढरपूर येथे राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांचा पंढरपूर कॉरिडॉर विकसित करण्यास प्रारंभ केला आहे. उत्तर प्रदेशात काशी विश्वनाथ आणि मध्य प्रदेश येथे महाकाल कॉरिडॉर अंतर्गत ज्योतिर्लिंग स्थळी उच्च दर्जाच्या सुविधा आणि विकासकार्य करण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील परळीसह १२ ज्योतिर्लिंग स्थळी रस्ते, दर्शन सभा मंडप, वाहनतळ, पूरक व्यवसायांना दुकाने यांसह विविध उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेत परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग समाविष्ट करावे, यासाठी राज्यशासनाने केंद्र सरकारला परिपूर्ण प्रस्ताव शिफारशीसह पाठवण्याची आवश्यकता आहे. परळीसमवेत राज्यातील सर्वच ज्योतिर्लिंग स्थळी प्रत्येकी ५०० कोटी रुपयांचा कॉरिडॉर सिद्ध करावा.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आमचे सरकार धर्माचे रक्षण करणारे सरकार आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्राचे महत्त्व अल्प करणार नाही. ते पवित्र श्रद्धास्थान आहे. परळी वैजनाथाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडून आल्यानंतर तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल. पंढरपूरप्रमाणे परळी वैजनाथ कॉरिडॉर आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेतंर्गत परळी वैजनाथसह १२ ज्योतिर्लिंगाचा समावेश करण्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.