राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर पुढील २ आठवडे कारवाई करण्यास स्थगिती !
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने २ आठवडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) त्यांना अटक अथवा अन्य कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयात रिसतर अटकपूर्व जामिनासाठी आवेदन सादर करावे, तसेच सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने या आवेदनावर तातडीने सुनावणी पूर्ण करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्याच्या याचिकेवरील सुनावणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आमदार या नात्याने आपण सध्या विधानसभेत व्यस्त असल्याची माहिती मुश्रीफांच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आली.
‘ईडी सध्या करत असलेल्या अन्वेषणात हसन मुश्रीफांना आरोपी बनवलेले नाही. त्यामुळे तुर्तास त्यांच्या अटकेचा प्रश्नच नाही. सध्या अन्वेषण अधिकारी प्राथमिक अन्वेषण करत आहेत. त्यांच्या तिन्ही मुलांनी या प्रकरणात सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलेला आहे. जर त्यांना अटकेची भीती असेल, तर त्यांनीही रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा’, असा युक्तीवाद ईडीच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ‘ईडी’कडून २ मासांत ३ वेळा धाड घालण्यात आली, तसेच त्यांना १३ मार्चला मुंबईत अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याचे समन्स बजावण्यात आले. त्यावर मुश्रीफ न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने वरील निर्देश दिले.